मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 22:20 IST2026-05-09T21:41:46+5:302026-05-09T22:20:46+5:30

Mumbai LTT Bengaluru Train Time Table: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्यापासून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनचे थांबे, वेळा असे सगळे टाइमटेबल समोर आले आहे.

Mumbai LTT Bengaluru Vande Bharat Sleeper Train: मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई ते बंगळुरू या मार्गावरील ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले आहे. तसेच कोणत्या मार्गावरून ही ट्रेन जाणार, याचीही माहिती समोर आली. आहे. कामाख्या-हावडा या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या यशस्वी लाँचिंगनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिली होती.

Mumbai LTT Bengaluru Superfast Train: या निर्णयामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे, असे म्हटले जात आहे. आताच्या घडीला वंदे भारत चेअर कार आणि वंदे भारत स्लीपर या दोन्ही ट्रेन अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. सुमारे १६० हून अधिक सेवा वंदे भारत चेअर कार ट्रेनच्या सुरू आहेत. तर एक वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आहे.

Mumbai LTT Bengaluru Biweekly Superfast Train: मुंबई ते बंगळुरू या मर्गावर दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत चर्चा सुरू असतानाच याच मार्गावर एक नवी कोरी सुपरफास्ट ट्रेन सुरू केली जात आहे. पुढील आठवड्यात १३ मे रोजी या ट्रेनची विशेष उद्घाटन फेरी होणार आहे. तर १९ मे २०२६ पासून मुंबई LTT ते बंगळुरू या मार्गावर या ट्रेनची नियमित सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुणे, सातारा, मिरज मार्गे पुढे बंगळूरू हा मार्ग या ट्रेनचा निश्चित करण्यात आला आहे.

Mumbai LTT Bengaluru Biweekly Superfast Train Full Time Table: बुधवार, १३ मे २०२६ रोजी बंगळुरू येथून या ट्रेनचे लोकार्पण केले जाणार आहे. या ट्रेनला १७ एलएचबी डबे असणार आहेत. बंगळूरूहून ही ट्रेन साधारणपणे सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मुंबईत पोहोचणार आहे.

Mumbai LTT Bengaluru Train: बंगळुरू ते मुंबई उद्घाटन विशेष फेरीत ही ट्रेन बंगळूरू येथून सुटेल आणि पुढे दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे आणि मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गाने येथे पोहोचणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेनची चर्चा सुरू होती. अखेर ही ट्रेन सुरू होत आहे.

मंगळवार, १९ मे २०२६ पासून बंगळुरू-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-बंगळुरू ही द्विसाप्ताहिक ट्रेन नियमितपणे सुरू होईल. नियमित फेरी सुरू झाली की, या ट्रेनचा क्रमांक १६५५३/१६५४ असा निर्धारित करण्यात आला आहे. बंगळुरू येथून ही ट्रेन शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी सुटेल. तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २० मे २०२६ पासून दर रविवारी आणि बुधवारी ही ट्रेन बंगळुरूसाठी रवाना होईल.

नियमित फेरीत ही ट्रेन बंगळुरू येथून ही ट्रेन रात्री ०८ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. यानंतर संपिगे रोड, दावणगिरी, करजगी, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गाने दुसऱ्या दिवशी रात्री ०८ वाजून ४० मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

रात्री बंगळुरूहून सुटल्यावर ही ट्रेन महाराष्ट्रात सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मिरज येथे पोहोचणार आहे. तर, सांगलीला ११ वाजून ०२ मिनिटे, कराडला १२ वाजून ०२ मिनिटे, सातारा दुपारी ०१ वाजून ०७ मिनिटे, लोणंदला दुपारी ०२ वाजून १७ मिनिटे, पुण्यात सायंकाळी ०४ वाजून ५० मिनिटे, लोणावळा येथे सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटे, कर्जत येथे सायंकाळी ०६ वाजून ३७ मिनिटे, कल्याणला रात्री ०७ वाजून २७ मिनिटे, ठाणे येथे रात्री ०७ वाजून ५२ मिनिटे आणि मुंबई LTTला रात्री ०८ वाजून ४० मिनिटे अशी येणार आहे.

परतीच्या प्रवासात ही ट्रेन मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. यानंतर ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, हुबळी, करजगी, दावणगिरी, संपिगे रोड या मार्गे बंगळूरू येथे पोहोचेल.

मुंबई LTT लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटल्यावर ही सुपरफास्ट ट्रेन ठाण्यात ११ वाजून २७ मिनिटे, कल्याणला (दिवस दुसरा) मध्यरात्री १२ वाजून ०२ मिनिटे, कर्जतला मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटे, लोणावळा येथे मध्यरात्री ०१ वाजून ५२ मिनिटे, पुण्यात रात्री ३ वाजता, लोणंद येथे पहाटे ०४ वाजून ४३ मिनिटे, सातारा येथे पहाटे ०५ वाजून ५७ मिनिटे, कराडला सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटे, आणि मिरज येथे सकाळी ०९ वाजून २५ मिनिटाला पोहोचेल आणि पुढे मग रात्री १० वाजून ३० मिनिटांनी बंगळुरू येथे पोहोचेल.

मुंबई-बंगळुरू या द्विसाप्ताहिक सुपरफास्ट ट्रेनच्या स्वच्छतेचे काम हुबळी आणि मिरज या विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. तर हुबळी, मिरज आणि पुणे येथे या ट्रेनमध्ये पाणी भरले जाणार आहे. या ट्रेनचे तिकीट किती असेल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मुंबई ते बंगळूरू या सुपरफास्ट ट्रेनमुळे मुंबईहून पुणे, सातारा, मिरज तसेच बेळगाव येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि हुबळीचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलीकडेच सांगितले होते की, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच मिरजसह पुणे, मुंबई, सातारा, बेळगावी आणि हुबळी दरम्यान प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.

दक्षिण पश्चिम रेल्वेला मुंबई-बंगळूरु मार्गावर नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. पूर्वी, ही ट्रेन पुणे-सोलापूर-कलबुर्गी मार्गावरून धावेल, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, या मार्गाने ही ट्रेन जाणार नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनला मुंबई ते बंगळूरु या प्रवासाला केवळ १४ तास लागण्याची शक्यता आहे.

ही ट्रेन मिरज जंक्शन, कराड, सातारा आणि पुणे यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, त्यामुळे मिरज आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष सोय उपलब्ध होईल. ही आधुनिक ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम असेल आणि यामध्ये स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय सुविधा, आरामदायक आसनव्यवस्था, बायो-टॉयलेट्स आणि पॅन्ट्री कार यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे या मार्गावरील अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. असे असले तरी मे महिन्यात सुरू होत असलेली ही द्विसाप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन ही स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी पूर्वचाचणी ठरेल. त्यावरून वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक थांबे निश्चित करण्यात येतील. किंबहुना याच ट्रेनची जागा वंदे भारत स्लीपर ट्रेन घेईल, अशा काही चर्चा असल्याचे म्हटले जात आहे.