खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 20:37 IST2026-05-09T20:32:08+5:302026-05-09T20:37:26+5:30
America Iran War: अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल केलेले दावे खोटे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
America Iran War: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची अद्याप चिन्हे नाहीत. होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव इतक्यात शमेल, असे दिसत नाही. पाकिस्तान मध्यस्थी करत असला, तरी आतापर्यंत वाटाघाटींना यश आलेले नाही. यातच मोज्तबा खामेनेई यांच्याबद्दल अनेक दावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. परंतु, आता अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी एक मोठा रिपोर्ट दिला असून, यामुळे ट्रम्प यांचे दावे फोल ठरतील, असे म्हटले जात आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या या रिपोर्टमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढू शकते, असे सांगितले जात आहे.
अमेरिकेसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याविषयी विविध दावे केले जात आहेत. २८ फेब्रुवारीपासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्याने, ते गंभीर जखमी झाले असून, इराणच्या बाहेर असल्याची अटकळ बांधली जात आहे. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी पुष्टी केली आहे की, खामेनेई पूर्णपणे सक्रिय आहेत. ते आपल्या लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच ट्रम्प प्रशासनासोबत सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत ठाम भूमिका घेत आहेत.
मोज्तबा खामेनेई युद्धाची रणनीती आणि वाटाघाटींबाबत निर्णय घेत आहेत
सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना असे वाटते की, इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोज्तबा खामेनेई, हे वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांसोबत मिळून युद्धनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये इराणची भूमिका तेच ठरवत आहेत. सूत्रांनी सांगितले की, इराणचे आधीचे प्रमुख खामेनेई यांच्या हत्येच्या हल्ल्यात मोज्तबा हेदेखील जखमी झाले होते. काही दिवसांनंतर, वडिलांच्या जागी त्यांना इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून ते त्यांच्या सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, परंतु अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना त्यांचा ठावठिकाणा शोधता आलेला नाही.
खामेनेई हे संवादासाठी विशेष पद्धत वापरत आहेत
एका सूत्राने सीएनएनला सांगितले की, या अनिश्चिततेचे एक कारण म्हणजे खामेनेई संवादासाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत नाहीत. त्याऐवजी, ते फक्त अशाच लोकांना भेटतात जे त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतात. संदेश पाठवण्यासाठी ते एका विश्वासू संदेशवाहकाचा वापर करतात. मोज्तबा खामेनेई जखमा भरून येत आहेत. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. खामेनेई यांच्या पायाला आणि कमरेला किरकोळ दुखापत झाली होती, तसेच त्यांच्या कानाच्या मागे एक छोटा तुकडा अडकला होता, पण आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे त्यांच्याच कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, मोज्तबा खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांना जी माहिती आहे, ती त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या निरीक्षणानुसार, खामेनेई इराणची युद्धनीती आखण्यात मदत करत आहेत, परंतु ते निर्णय घेण्याच्या बैठकांमध्ये थेट सहभागी होत नाहीत. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाते. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि मोज्तबा खामेनेई यांच्यात अडीच तासांची बैठक झाली. या बैठकीमुळे मोज्तबा यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले जात आहे.