दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 23:29 IST2026-05-09T23:28:09+5:302026-05-09T23:29:21+5:30
Delhi On High Alert: अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी एका गटाचा पर्दाफाश केला होता.

दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
Delhi On High Alert: राजधानी दिल्लीला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या काही संवेदनशील माहितीनंतर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. तसेच दिल्लीतील अनेक संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भाजपा मुख्यालय, सरकारी कार्यालये, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी दहशतवादी हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय, दीनदयाल उपाध्याय मार्गावरील कार्यालये आणि आजूबाजूच्या शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अतिरिक्त सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले असून, बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहेत. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिल्लीतील प्रमुख कार्यालये आणि गर्दीच्या भागांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी माहिती यंत्रणांना मिळाली आहे. संभाव्य हल्ल्यांमध्ये आत्मघाती हल्ले, वाहनांमधील स्फोटके, गोळीबार आणि समन्वित हल्ल्यांचा समावेश आहे.
सुरक्षा यंत्रणा संपूर्ण शहरात सतत पाळत ठेवून आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या सरकारी इमारती, राजकीय कार्यालये, बाजारपेठा, वाहतूक केंद्रे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी घातपात प्रतिबंधक तपासणी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण शहरात सतत पाळत ठेवून आहेत. बॉम्ब शोधक पथके, स्निफर डॉग पथके आणि जलद प्रतिसाद पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी दिल्ली अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संवेदनशील भागांमधील संशयास्पद हालचाली, बेवारस वस्तू आणि पार्क केलेल्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
स्थानिक पोलिसांकडून तपासणी, पडताळणी मोहीम
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये आणि वस्त्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून अचानक तपासणी आणि पडताळणी मोहीम राबवली जात आहे. गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या समन्वयाने सर्व जिल्हा युनिट्सना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी एका गटाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. हा गट दिल्लीत मोठ्या प्रमाणात लक्ष्यित हल्ल्यांची तयारी करत होता, अशी माहिती यातून पुढे आली. या गटाने राजधानीतील एका मंदिरासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली होती. याचे व्हिडिओ त्यांच्या सूत्रधारांना पाठवले होते. महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा दलांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.