Tarot Card: प्रयत्नात कसूर करू नका, तरच चमत्कार घडेल; वाचा २६ एप्रिल ते २ मे चे साप्ताहिक भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:05 IST2026-04-25T08:01:01+5:302026-04-25T08:05:02+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार २६ एप्रिल ते २ मे चे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. यात पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार दिलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

मूलांक १: (जन्म तारीख १/१०/१९/२८)
हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. काही प्रमाणत ताण किंवा दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. मनाने भक्कम राहून पुढची वाटचाल केली तर काही प्रमाणात यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोके, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या.

मूलांक २: (जन्म तारीख २/११/२०/२९)
हा सप्ताह तुमच्यासाठी चढाओढीचा असणार आहे. किरकोळ वादविवाद किंवा भांडणं होऊ शकतात. एखादी स्पर्धा किंवा परीक्षा द्यायची वेळ येईल. काही लोकांमुळे हातची संधी जाऊ शकते. नोकरी व्यवसायात तुमच्या मताला किंमत मिळण्यासाठी तुम्हाला बरीच धडपड करावी लागेल. या आठवड्यात इतरांवर पटकन विश्वास ठेवू नका. लोकांना काहीतरी पटवून देण्यापेक्षा त्यांना ते आपोआप पटेल असं करुन दाखवा. तुम्ही मागे राहून किंवा हातपाय गाळून चालणार नाही, आलेल्या परिस्थितीशी दोन हात करा!

मूलांक ३: (जन्म तारीख ३/१२/२१/३०)
हा सप्ताह तुमच्यासाठी अवघड वळणाचा आहे. किरकोळ दुखापत होऊ शकते म्हणून सावकाश काम करा. बरीच जबाबदारी अंगावर पडेल. पण तुम्हाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी आता संपणार आहेत, हा विश्वास ठेवा! या आठवड्यात तुम्ही परिस्थितीशी झगडायला जाऊ नका. लोकांशी बोलताना नम्रपणे आणि कमीपणा घेऊन बोललात तर त्रास कमी होईल. आत्ता तुमचे वर्चस्व दाखवण्याची वेळ नाही. विश्रांती घ्या. मान, पाठ, कंबर आणि डोकं हे काही दुखेल असं मुद्दाम वागू नका. झोप पूर्ण घ्या, रात्रीचे वाद आणि चर्चा टाळा.

मूलांक ४: (जन्म तारीख ४/१३/२२/३१)
हा सप्ताह तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी एकाच वेळी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुमची तारांबळ उडू शकते. तुम्हाला ओझं वाहून नेत असल्याप्रमाणे वाटू शकतं. एक प्रकारचं दडपण आणि ताण येऊ शकतो. पण हा शेवटचा टप्पा आहे हे लक्षात ठेवा! या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टी स्वतःवर ओढवून घेऊ नका, त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मान, पाठ, डोकं आणि डोळे यांच्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला वाटत असेल तेव्हा मदत नक्की मागा. जगात अजून मदत करणारी चांगली माणसं आहेत यावर विश्वास ठेवा!

मूलांक ५: (जन्म तारीख ५/१४/२३)
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात पण एकुणात परिस्थीत चांगली राहील. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल. एखादा प्रवास घडेल. या आठवड्यात तुम्ही अतिशय प्रामाणिकपणा जपण्याची गरज आहे. संवाद कौशल्यात सुधारणा करा. वाचन, लेखन यासारख्या गोष्टींत मन रमवा. फक्त लहान तोंडी मोठा घास घेऊ नका!

मूलांक ६: (जन्म तारीख ६/१५/२४)
हा सप्ताह तुमच्यासाठी देवाण घेवाण करणारा असणार आहे. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. अडकलेल्या कामात काही प्रमाणत पुढे जाऊ शकता. आहे ती परिस्थिती सुधारेल, एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. एखादे बक्षीस मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा.

मूलांक ७: (जन्म तारीख ७/१६/२५)
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा आहे. कष्टाचे हवे तसे फळ मिळणे थोडे कठीण आहे. विलंब होईल. पण यामुळेच तुम्ही अंतर्मुख व्हाल आणि नवीन मार्ग सापडेल! परिस्थितीचा स्वीकार करुन आनंदाने मार्गक्रमण कराल. निरस व्हाल पण निराश नाही! स्वार्थ सोडून परमार्थाचा विचार येईल. या आठवड्यात तुम्ही विवेकबुद्धी आणि धीराने वागा. आत्मोन्नतीचा मार्ग शोधा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका, त्या पूर्ण होणार नाहीत. भौतिक पसाऱ्यातून स्वतःला थोडे अलिप्त करून बघा. एकांतात वेळ घालवा.

मूलांक ८: (जन्म तारीख ८/१७/२६)
हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान वाटणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल! या आठवड्यात खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.

मूलांक ९: (जन्म तारीख ९/१८/२७)
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याचा आहे. नवीन काम मिळू शकतं. कामात बदल घेऊ शकतात. आत्तापर्यंत ज्याची वाट पाहत होता, ती घटना घडू शकते, किंवा त्या घटनेसंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. केलेली मेहनत फलित होईल. तुम्हाला आतून ऊर्जा मिळेल, जिद्द राहील, उत्साही वाटेल. सकारात्मक वाटचाल होईल. या आठवड्यात तुम्ही एखादा प्रयोग, एखादं नवखं काम हाती घेऊ शकता. तुमची कला, क्रीडा, छंद लोकांसमोर सादर करा. विनम्रपणे, पाय जमिनीवर ठेवून इतरांसमोर व्यक्त व्हा.

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता. ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com

















