Top Marathi News LIVE: काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान, पंतप्रधान मोदींचा टोला!
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:06 IST2026-03-13T09:59:33+5:302026-03-13T18:06:41+5:30
अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे आणि महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE: काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान, पंतप्रधान मोदींचा टोला!
Latest US-Israel Iran War, Maharashtra News Live Update in Marathi: महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आणि काळजी पाहायला मिळतेय. अमेरिका, इस्रायल आणि इराण या तीनही देशांपैकी कुणीही मागे हटायला तयार नसल्यानं युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत. या युद्धात मध्य-पूर्वेतील आखाती देशांवरही हल्ले होत आहे आणि भारत इंधनासाठी या देशांवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळे इंधन टंचाईची भीती व्यक्त होतेय. देशाकडे पुरेसं इंधन उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे, मात्र अनेक भागात सिलिंडरसाठी रांगा दिसत आहेत. अनेकांनी चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. संसदेच्या अधिवेशनात याच विषयावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या अधिवेशनात गॅस टंचाईचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
LIVE
13 Mar, 26 : 08:40 PM
राजस्थानमध्ये भीषण अपघात; नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू
राजस्थान येथील रिंगस परिसरातील खाटु श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. सालासर रोड येथे झालेल्या भीषण अपघातात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
13 Mar, 26 : 07:42 PM
ओबीसी, दलित आदिवासी अल्पसंख्यांकांना काँग्रेसने दिलेले हक्क काढून घेण्याचा भाजपचा डाव, प्रा. वसंत पुरके यांचा आरोप
भाजपाची फोडा आणि राज्य करा निती असून समाजात जाती धर्मांमध्ये भांडणे लावून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानामुळे आणि काँग्रेस सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे या देशातील गरीब, ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. भाजप सरकार हळूहळू या सर्वांचे हक्क काढून घेत आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांवरील निधीची कपात करत आहे. विकासाची स्वप्ने दाखवून भाजप समाजात विभागणी करत आहे. भाजपाच्या दडपाशाहीला व भूलथापांना बळी पडू नका, काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो असे वसंत पुरके म्हणाले.
13 Mar, 26 : 05:58 PM
काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान, पंतप्रधान मोदींचा टोला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. काँग्रेस हे खोट्या आश्वासनांचे एक दुकान असून जनतेला दिलेली अश्वासने पूर्ण करण्याचा त्यांचा मुळीच इरादा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
13 Mar, 26 : 05:51 PM
मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकराझार जिल्ह्यात ४,५७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवा आणि घुसखोरांसाठी इथे कोणतीही जागा नाही, असा स्पष्ट संदेश द्या, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. वाचा सविस्तर
13 Mar, 26 : 05:47 PM
LPG वरून PNG कडे शिफ्ट व्हा; गॅस पुरवठ्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाचा ग्राहकांना संदेश
पेट्रोलियम मंत्रालयातील सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, सध्या देशात एलपीजी किंवा एलएनजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी गॅसचा पुरवठा करण्यास सरकार पूर्णपणे सक्षम असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. ज्या कुटुंबांकडे पीएनजी कनेक्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी तातडीने एलपीजीवरून पीएनजीकडे स्थलांतरित व्हावे. देशात सध्या अशी सुमारे ६० लाख कुटुंबे आहेत जी लगेच पीएनजी गॅसचा वापर सुरू करू शकतात.
13 Mar, 26 : 05:00 PM
धक्कादायक! साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; एकाला अटक
साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर कल्याणजवळ एक धक्कादायक घटना घडली. दगडफेक झाल्याने C2 आणि C3 कोचच्या खिडकीची काच फुटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. या प्रकरणात आरोपी सनी कांबळे (वय २२) याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.
13 Mar, 26 : 04:44 PM
उल्हासनगरात मालमत्ता व पाणी बिल करासाठी अभय योजना, विलंब शुक्ल होणार माफ
उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता व पाणीबिल करावरील विलंब शुल्क माफ करण्यासाठी १३ ते १६ मार्च या ४ दिवसासाठी अभय योजना लागू केली. नागरिकांनी अभय योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्तानी केले असून एक रक्कमी मालमत्ता व पाणी बिल कर देयक अदा केल्यास त्यावरील विलंब शुल्क व व्याज माफ होणार आहे.
13 Mar, 26 : 03:26 PM
मोठा रेल्वे अपघात टळला; शहडोल–नागपूर एक्सप्रेसची चाक रुळावरून घसरली
नागपूर : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली. दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनला जोराचा धक्का बसला आणि प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. मात्र सुदैवाने या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना झाले असून, ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याचे तसेच मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
13 Mar, 26 : 03:00 PM
युद्धाचा परिणाम; सिलिंडरअभावी गणपतीपुळेत लाडू प्रसाद बंद
युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या कमतरतेचा फटका वेगवेगळ्या हॉटेल्ससह सुप्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानलाही बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने श्री देव गणपतीपुळे संस्थानमार्फत भक्तांना दिला जाणारा लाडू प्रसाद तात्पुरता बंद करण्यात आला असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले. भाविकांना दिला जाणारा दुपारचा खिचडी प्रसाद व संध्याकाळचा पुलाव प्रसाद चालू असला, तरी गॅसपुरवठा सुरळीत न झाल्यास तोही बंद होऊ शकतो असे सांगण्यात आले.
13 Mar, 26 : 02:40 PM
इस्रायलमध्ये मिसालई हल्ला, अनेक लोक जखमी
उत्तर इस्रायलमधील एका गावात मिसाईल हल्ल्याची घटना घडली. या मिसाईल हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या आणीबाणी सेवा विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
रुग्णवाहिका सेवेचे मॅगन डेव्हिड अडोम यांनी सांगितले की, पॅरामेडिक्सने ५८ लोकांवर उपचार केला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. जरजीर गावात झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.
छरे लागल्यामुळे एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ५७ जणांना जास्त दुखापत झालेली नाही. सध्या या घटनेचा तपास केला जात आहे.
13 Mar, 26 : 02:22 PM
इराण–अमेरिका युद्धाचा फटका; डोंबिवली एमआयडीसीतील उद्योगांवर गॅस टंचाईचे संकट
इराण–अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद आता डोंबिवली एमआयडीसीत उमटू लागले आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यवसायासोबतच औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
13 Mar, 26 : 01:01 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे १४ महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयराम चाटे याला तब्बल चौदा महिन्यांनंतर काही तासांसाठी कारागृहाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. जयराम चाटे याचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे २ मार्च रोजी निधन झाले असून त्याच्या बाराव्याच्या धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व विशेष न्यायालयाने ही सवलत दिली आहे.
13 Mar, 26 : 12:39 PM
अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन अटॅक
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता पूर्णतः लष्करी संघर्षाच्या दिशेने वळताना दिसत आहे. पाकिस्तानने गुरुवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकना प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि 'अफगाण डिफेन्स फोर्सेस'ने मोठ्या प्रमाणावर काऊंटर अटॅक सुरू केले आहेत. लेटेस्ट रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांना टार्गेट करत ड्रोन हल्ले केले आहेत. वाचा सविस्तर
13 Mar, 26 : 12:28 PM
इराणवर अमेरिकेचे हल्ले वाढणार? डोनाल्ड ट्रम्प स्पष्टच बोलले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ""आमच्याकडे प्रचंड ताकद आहे. अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते, ते फक्त पहा", असे म्हणत युद्ध लांबण्याचेच संकेत दिले आहेत.
"इराणचे नौदल, त्यांचे हवाई दल आता उरलेले नाही. त्यांच्या मिसाईल्स, ड्रोन्स आणि इतर सर्व काही उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांचे नेते पृथ्वीवरून पूर्णपणे संपवले गेले आहेत", असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
13 Mar, 26 : 12:07 PM
रत्नागिरीत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या पुन्हा मोठ्या रांगा
रत्नागिरी शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गैरसोय कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. जवळपास दोनशेहून अधिक ग्राहक सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. सलग सहाव्या दिवशी ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीकडे धाव घ्यावी लागत आहे. अनेकांनी २० ते २० दिवसांपूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यातच उन्हाच्या कडाक्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
13 Mar, 26 : 11:49 AM
सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले, काँग्रेस नेत्याची टीका
या सरकारच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे जनतेचे हाल त्यांना दिसत नाहीत. गॅस टंचाई, इंधन तुटवड्यामुळे जनता हैराण झाली आहे. सरकारने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेत. एपस्टीन फाईल्समध्ये हरदीप सिंग पुरी यांचे नाव आले आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
13 Mar, 26 : 11:46 AM
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी
इस्रायल-इराण संघर्ष सुरू असतानाच आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष देखील टोकाला गेला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या विविध शहरांवर एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांना टार्गेट करण्यात आलं असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
13 Mar, 26 : 11:22 AM
दिल्ली मेट्रोच्या नव्या मार्गावर ५०० मीटर केबलची चोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी ज्या नवीन मेट्रो कॉरिडॉरचे भव्य उद्घाटन केलं होतं, त्याबाबत अवघ्या चार दिवसांतच धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिपाली चौक ते मजलिस पार्क दरम्यान सिग्नलिंग केबलची मोठी चोरी झाल्यामुळे गुरुवारी मेट्रोच्या वेगाला 'ब्रेक' लागला, ज्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. वाचा सविस्तर
13 Mar, 26 : 11:19 AM
राज्यात 'या' ४ दिवसात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत बदल होण्याची शक्यता आहे. येत्या १७ ते २० मार्च या ४ दिवसात राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (सविस्तर वाचा)
13 Mar, 26 : 10:53 AM
व्यापारी महासंघ व हॉटेल व्यावसायिकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता बारामती शहरातही जाणवू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील सुमारे ४०० व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याबाबत बारामती व्यापारी महासंघाने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
13 Mar, 26 : 10:52 AM
आखाती युद्धाचा तांदूळ निर्यातीला मोठा तडाखा, शेतकरीही अडचणीत
विदर्भाचा तांदूळ जिल्हा म्हणून ओळख असलेल्या 'भंडारा' जिल्ह्याला आता आखाती देशातील युद्धाची झळ पोहोचू लागली आहे. गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जिल्ह्यातून होणारी तांदूळ निर्यात निम्म्यावर आली असून वाहतुकीचा खर्च वाढल्याने तांदूळ खरेदीही ठप्प झाली आहे. याचा थेट फटका आता स्थानिक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.
13 Mar, 26 : 10:23 AM
राज्य सरकार ठरवणार कोणाला मिळणार कमर्शियल गॅस सिलिंडर
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत भारतीयांना दिलासा दिला आहे. "देशात कच्च्या तेलाचा भरपूर साठा असून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची टंचाई नाही," अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)
13 Mar, 26 : 10:20 AM
घरात रॉकेल, हॉटेलात वापरा कोळसा; सरकार म्हणते देशात गॅसटंचाई नाही
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशांमध्ये सर्वत्र ऊर्जा टंचाई जाणवत असताना केंद्रीय पेट्रोलियम खात्याने घरगुती वापरासाठी केरोसिन आणि हॉटेल-रेस्टॉरंटसाठी कोळशाचा तात्पुरता वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यांना नियमित १ लाख किलो लिटर कोट्याव्यतिरिक्त अधिक ४८,००० किलोलिटर केरोसिन घरगुती स्वयंपाकासाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच हॉटेल व खाद्य व्यवसायासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा एक महिन्यासाठी वापर करण्याची परवानगी दिली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी हे निर्णय जाहीर केले. (सविस्तर वाचा)
13 Mar, 26 : 10:18 AM
गॅसचा तुटवडा; कोळशाच्या शेगडीचे दर गगनाला १२०० रुपयांची शेगडी थेट ५ हजारांना
इराण-इज्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका आता छोट्या हॉटेल व्यवसायिकांना बसू लागला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक छोटे हॉटेल चालक कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करून पदार्थ विकण्याकडे वळले आहेत. मात्र नवी मुंबईतील बाजारात कोळशाच्या शेगड्या उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना त्या खरेदी करण्यासाठी मुंबई गाठावी लागत आहे. वाढलेल्या मागणीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी शेगड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.