"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:45 IST2026-05-18T17:44:26+5:302026-05-18T17:45:02+5:30
अशोक सराफ यांनी फोटो पोस्ट करत लिहिले...

"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सम्मानित झालेले दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या लोकप्रियता अफाट आहे. ८०-९० च्या दशकात त्यांनी आपल्या सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं तर कधी रडवलं. आज वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी थेट जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी निवेदिता सराफही होत्या. या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जात त्यांनी आपल्या मराठीचं प्रतिनिधित्व केलं. या सोहळ्यानंतर आता त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
अशोक सराफ यांचा कान्सच्या रेड कार्पेटवरील लूक खूप खास होता. आपल्या साधेपणाने त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे तोच साधेपणा अगदी कान्समध्येही दिसला. सर्वांना नमस्कार करत त्यांनी अभिवादन केलं. तर त्यांच्यासोबत निवेदिता सराफ या नऊवारी साडीत खूप सुंदर दिसत होत्या. अशोक सराफ यांनी त्यांचे दोन फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, "मराठी वारशाची शान घेऊन कान्सच्या रेड कार्पेटवर टाकलेलं प्रत्येक पाऊल खास होत."
अशोक सराफ यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. 'तुम्हाला कान्समध्ये बघून खूप बरं वाटलं', 'त्या कॅन्सच्या रेड कार्पेट च खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल, की अशोक मामांच्या पाऊला नी ते धन्य झालं', 'तुमच्यामुळे रेड कार्पेटची शोभा द्विगुणित झाली...मराठी रसिक म्हणुन आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे'. अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
'कान्स' मधील भारत पॅव्हिलियन येथे अभिजात मराठी ओटीटीचं ग्लोबल लाँच आयोजित करण्यात आलं होतं. या जागतिक लाँचला अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि अभिजात मराठी OTT चे संस्थापक केदार जोशी उपस्थित होते. सर्वांचेच लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.