सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 19:14 IST2026-05-18T19:13:21+5:302026-05-18T19:14:55+5:30
Petition Against Udhayanidhi In Supreme Court: हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे.

सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Petition Against Udhayanidhi In Supreme Court: तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच पुन्हा एकदा सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, १९ मे रोजी या यावर सुनावणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले असून, याबाबत नव्या सरकारी काय भूमिका असेल, याकडे देशाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, अण्णादुराई, कलैगनार, डीएमकेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे आभार मानतो. देशासमोर एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे. विरोधात बसो वा सत्तेत बसो डीएमके हा केवळ एक विरोधी पक्ष नाही तर एक शक्तिशाली पक्ष बनेल. तामिळनाडूच्या हितासाठी आपण मिळून काम केले पाहिजे, असे उदयनिधी यांनी सांगितले. यावेळी उदयनिधी यांनी सनातन धर्माला संपवलेच पाहिजे, असे विधान केले. यावरून देशात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुल्याचे म्हटले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका
तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या अलीकडील आक्षेपार्ह वक्तव्यांचे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या नवीन तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. शनिवारी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, सप्टेंबर २०२३ मध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरियाप्रमाणे नष्ट करण्याबद्दल भाष्य केले होते, तेव्हा त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या उपस्थितीत विधानसभेत सनातन धर्माविरोधात केलेल्या त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यासंदर्भात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, हा न्यायिक प्रक्रियेचा अपमान आहे.