Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:23 IST2026-04-17T19:18:19+5:302026-04-17T19:23:38+5:30

कोकणच्या कुशीत एक असं शहर वसलेलं आहे, ज्याला आपल्या सौंदर्यामुळे 'कोकणचं स्वित्झर्लंड' म्हटलं जातं.

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते अथांग समुद्रकिनारे आणि हिरवागार निसर्ग. पण कोकणच्या कुशीत एक असं शहर वसलेलं आहे, ज्याला आपल्या सौंदर्यामुळे 'कोकणचं स्वित्झर्लंड' म्हटलं जातं. हे शहर म्हणजे सावंतवाडी!

या शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हिरा म्हणजे इथला 'मोती तलाव'. जर तुम्ही या सुट्टीत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर सावंतवाडीच्या या ऐतिहासिक तलावाला नक्की भेट द्या.

सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा मोती तलाव केवळ पाण्याचा साठा नसून तो राजघराण्याच्या वैभवाची साक्ष देतो. तलावाच्या काठावरच भव्य आणि दिमाखदार 'सावंतवाडी राजवाडा' उभा आहे. तलावाच्या संथ पाण्यात जेव्हा या राजवाड्याचं प्रतिबिंब पडतं, तेव्हा तो नजारा पाहण्यासारखा असतो. इतिहासाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

मोती तलावाची खरी मजा संध्याकाळच्या वेळी येते. तलावामध्ये बसवलेले रंगीबेरंगी कारंजे आणि त्यातून उडणारे पाण्याचे तुषार पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई केली जाते, तेव्हा हा परिसर एखाद्या स्वप्न नगरीसारखा भासतो. तलावाच्या चहुबाजूंनी असलेल्या पदपथावर फेरफटका मारताना मिळणारा आनंद शब्दांत मांडता येण्याजोगा नाही.

पर्यकांसाठी येथे नौकाविहाराची उत्तम सोय उपलब्ध आहे. तलावाच्या मध्यभागी बोटीतून फिरताना शहराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच, जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल, तर मोती तलाव तुमच्यासाठी नंदनवनच आहे. सूर्यास्ताच्या वेळी राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर टिपलेले फोटो तुमच्या सोशल मीडियाची शान वाढवतील यात शंका नाही.

थोडक्यात सांगायचं तर, शांतता, इतिहास आणि निसर्ग यांचं त्रिवेणी संगम म्हणजे सावंतवाडीचा मोती तलाव. त्यामुळे या वीकेंडला बॅग भरा आणि निघा कोकणच्या स्वित्झर्लंडला!