"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:24 IST2026-04-16T17:22:08+5:302026-04-16T17:24:36+5:30
Nida Khan : नाशिकच्या टीसीएस (TCS) बीपीओशी संबंधित प्रकरण सध्या सतत चर्चेत आहे. आतापर्यंत या केसमध्ये धर्मांतर, लैंगिक छळ आणि संघटित पद्धतीने कर्मचाऱ्यांना टार्गेट करणं यासारखे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत.

"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
नाशिकच्या टीसीएस (TCS) बीपीओशी संबंधित प्रकरण सध्या सतत चर्चेत आहे. आतापर्यंत या केसमध्ये धर्मांतर, लैंगिक छळ आणि संघटित पद्धतीने कर्मचाऱ्यांना टार्गेट करणं यासारखे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत. पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. याच दरम्यान आरोपी शाहरुखच्या पत्नीने 'आजतक'शी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या प्रकारे हे प्रकरण दाखवलं जात आहे, ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असल्याचं तिने म्हटलं आहे.
शाहरुखच्या पत्नीचं म्हणणं आहे की, सर्वात आधी एफआयआर (FIR) मध्ये नक्की काय लिहिलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तिच्या मते, "मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की, एफआयआरमध्ये ज्या गोष्टी म्हटल्या आहेत, त्यात कुठेही धर्मांतर किंवा रॅकेट चालवण्यासारखा आरोप नाही. त्यात फक्त इतकंच म्हटलं आहे की, ते फक्त मजा-मस्करी करायचे किंवा गप्पा मारायचे. ज्याप्रकारे याला धर्मांतर रॅकेट म्हणून सादर केलं जात आहे ते चुकीचं आणि बनावट आहे."
शाहरुखने महिला कर्मचाऱ्यांच्या कपड्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली का? या प्रश्नावर त्याची पत्नी म्हणाली, "कॉर्पोरेट क्षेत्रात जर कोणी कोणाच्या कपड्यांवर काही बोललं, तर ती सहसा कॉम्प्लिमेंट असते. याचा अर्थ असा नाही की, कोणी कोणाला जज करत आहे किंवा त्रास देत आहे. ज्या प्रकारे हे मांडले जात आहे, तसं काहीही नाही." तिने स्पष्ट केलं की अशा आरोपांना उगाचच वाढवून-चढवून सांगितलं जात आहे.
"हे सर्व पूर्णपणे खोटं आहे"
काही तक्रारींमध्ये असंही म्हटलं आहे की, महिला कर्मचाऱ्यांना रिसॉर्टवर नेण्यासारखे प्रस्ताव दिले गेले. यावर शाहरुखची पत्नी म्हणाली, "हे सर्व पूर्णपणे खोटं आहे. ज्या मुलींची नावं समोर आली आहेत, त्यांना आम्ही कधी पाहिलं देखील नाही. माझे पती स्वतः टीम लीडर आहेत आणि त्यांच्या हाताखाली १५-२० लोक काम करतात. जर कोणी चूक केली तर ते ओरडतात आणि चांगले काम केलं तर कौतुकही करतात. पण या आरोपांना कोणताही आधार नाही." तिने पुढे असंही सांगितले की, दुसरा आरोपी दानिश आणि एका महिला कर्मचारी यांच्यात दीर्घकाळापासून संबंध होते, जे आता या केसशी जोडून सादर केले जात आहेत. त्यांच्यात चार वर्षांपासून नातं होतं आणि ही बाब कॅम्पसमध्ये सर्वांना माहित होती. जर दोन सज्ञान व्यक्ती नात्यात असतील, तर तो त्यांचा खासगी विषय आहे. याचा अर्थ असा नाही की त्याला गुन्ह्याशी जोडले जावे.
HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
इतक्या वर्षात एकही तक्रार नाही
शाहरुखच्या पत्नीने तिच्या पतीच्या रेकॉर्डचाही उल्लेख केला. तिने सांगितलं की, तो अनेक वर्षांपासून काम करत आहे. जर असं काही असतं, तर आधीच तक्रारी आल्या असत्या. पण आजपर्यंत त्याच्याविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. अलीकडेच त्याने कंपनीची एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याला पदोन्नती देखील मिळाली. अचानक इतके गंभीर आरोप समोर येणं अनेक प्रश्न निर्माण करतं. एफआयआरमध्ये काही ठिकाणी हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचाही आरोप आहे. यावर पत्नीने सांगितलं की, "आम्हाला याबद्दल काहीही माहित नव्हतं. जेव्हा या गोष्टी समोर आल्या, तेव्हा आम्हाला समजलं. मी स्वतः पतीला विचारलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कधीही अशी कोणतीही गोष्ट केलेली नाही. टीसीएससारख्या मोठ्या आणि प्रोफेशनल कंपनीत काम करणारी व्यक्ती अशा गोष्टी कशी काय करू शकते, हे समजण्याच्या पलीकडे आहे."
अटकेवर उपस्थित केले सवाल
शाहरुखच्या अटकेबाबतही त्याच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने सांगितलं की, "१ एप्रिलच्या रात्री पोलीस साध्या कपड्यात आमच्या घरी आले आणि म्हणाले की स्टेटमेंटवर सही करण्यासाठी शाहरुखला सोबत यावं लागेल. आम्ही पूर्ण सहकार्य करत होतो, म्हणून तो त्यांच्यासोबत गेला. पण नंतर समजलं की त्याला अटक करण्यात आली आहे. आम्हाला आधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. जर इतके गंभीर आरोप होते, तर आधी माहिती का दिली गेली नाही?"
"फक्त काही लोकांनाच का अटक झाली?"
तिने असाही आरोप केला की सर्वांना समान पद्धतीने पाहिलं गेलं नाही. ऑफिसचे इतर लोकही तिथे उपस्थित होते, पण फक्त काही लोकांनाच अटक का झाली, हे समजत नाही. महिला कर्मचाऱ्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याच्या घटनांबाबत ती म्हणाली, "हे देखील पूर्णपणे खोटे आरोप आहेत. जर असं काही घडलं असतं, तर त्याचे पुरावे असायला हवेत. इतकी मोठी चौकशी सुरू आहे, पण आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. जर हे सर्व ३-४ वर्षांपासून सुरू होते, तर इतक्या दिवसांत कोणतीही कारवाई का झाली नाही?"
"आम्हाला न्याय मिळेल"
शाहरुखची पत्नी पुढे म्हणाली, "जर कोणासोबत इतके काही घडत होते, तर त्यांनी आधी तक्रार का केली नाही? कंपनीत मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना का सांगितलं नाही?" थेट इतके मोठे आरोप करणं आणि ते मीडियात अशा प्रकारे मांडणं योग्य नसल्याचं तिचं म्हणणं आहे. तिने सांगितलं की, तिचे कुटुंब तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. "आमचा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे की सत्य समोर येईल आणि आम्हाला न्याय मिळेल." तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांचं कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली असल्याचंही तिने नमूद केलं.