ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:15 IST2026-04-17T18:14:48+5:302026-04-17T18:15:08+5:30

Russia Cuba Oil Supply : ७ लाख बॅरल तेलाची मदत पाठवून रशियाने अमेरिकेला दिला मोठा संदेश.

Russia Cuba Oil Supply : Russia sends 7 lakh barrels of oil to Cuba despite US tariff threats | ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला

ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला

व्हेनेझुएलावर कारवाई करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाची ऊर्जा नाकेबंदी केलेली आहे. इराणनंतर क्युबाचा नंबर लागणार असेही ट्रम्प धमकी देत आहेत. अशातच अमेरिकेच्या धमक्यांना झुगारून रशियाने सात लाख बॅरल तेलाचा पुरवठा केला आहे. 

क्युबाला गेले तीन महिने कुठूनच कच्चे तेल मिळालेले नाही. क्युबाला व्हेनेझुएला कच्चे तेल पुरवत होता. परंतू, अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई करत राष्ट्राध्यक्ष मादुरोंना ताब्यात घेत व्हेनेझुएलाचा तेल बाजारावरच कब्जा केला होता. यामुळे क्युबाला देखील तेल मिळणे अशक्यप्राय झाले होते. शियाने क्युबाला सात लाख बॅरल तेलाचा पुरवठा केला असून, या मदतीमुळे क्युबाचा ऊर्जा संकट अंशतः दूर होण्यास मदत झाली आहे. भारतात क्युबाचे राजदूत जुआन कार्लोस एगुइलेरा यांनी रशियाच्या या कृतीचे स्वागत करत, "हा जगाला एक मोठा संदेश आहे," असे म्हटले आहे. 

राजदूत एगुइलेरा यांचे महत्त्वाचे विधान
नवी दिल्लीत दिलेल्या मुलाखतीत राजदूत एगुइलेरा म्हणाले की, "तीन महिन्यांपासून तेलाचा थेंबही मिळाला नव्हता त्या क्युबाच्या किनाऱ्यावर  रशियन जहाज पोहोचले आहे. हे केवळ तेल नव्हते, तर रशिया संकटाच्या काळात क्युबाच्या पाठीशी उभा राहील, असा जगाला दिलेला संदेश होता." अमेरिकेने क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याची किंवा संबंधित देशांवर जादा टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती, तरीही रशियाने हे धाडस दाखवले आहे.

व्हेनेझुएलाचे सहकार्य थांबले
३ जानेवारी रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर, व्हेनेझुएलातून होणारा तेल पुरवठा पूर्णपणे बंद झाला. अमेरिकेच्या दबावामुळे मेक्सिकोनेही क्युबाला होणारा तेल पुरवठा थांबवला आहे. क्युबामधील सुमारे १.१ कोटी लोकसंख्येला सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.

रशिया आणि चीनची भूमिका
रशियाचे परराष्ट्र मंत्री सॅर्गेई लावरोव यांनी जाहीर केले आहे की, रशिया क्युबाला इंधन आणि मानवी मदत पुरवणे सुरूच ठेवेल. विशेष म्हणजे, चीन दौऱ्यावर असताना लावरोव यांनी स्पष्ट केले की, या सहकार्यात चीन देखील महत्त्वाची भूमिका बजावेल.

Web Title : ट्रंप को चुनौती, रूस ने क्यूबा को तेल पहुँचाया, ऊर्जा संकट में मदद

Web Summary : रूस ने अमेरिकी प्रतिबंधों के बावजूद क्यूबा को 7 लाख बैरल तेल भेजा। वेनेजुएला से आपूर्ति रुकने के बाद क्यूबा ईंधन संकट से जूझ रहा था। रूस का कदम संकट में समर्थन का संदेश देता है। चीन भी मदद कर सकता है।

Web Title : Russia Defies Trump, Delivers Oil to Cuba Amidst Energy Crisis

Web Summary : Russia shipped 700,000 barrels of oil to Cuba, defying US sanctions. Cuba faced a fuel crisis after Venezuela's supply halted due to US action. Russia's move, hailed by Cuba, sends a message of support during hardship. China may also assist.