भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:40 IST2026-04-17T17:40:23+5:302026-04-17T17:40:56+5:30
Bank of Maharashtra Singrauli Bank Robbery: बँक ऑफ महाराष्ट्रवर ३५ लाखांचा सशस्त्र दरोडा; मॅनेजरवर हल्ला, हवेत फायरिंग.

भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील बैढन परिसरात शुक्रवारी दुपारी एका थरारक बँक दरोड्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेत ५ सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून केवळ १५ ते २० मिनिटांत ३५ लाख रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी बँकेत फायरिंग केली आणि विरोध करणाऱ्या बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केला.
दुपारी १२:५० च्या सुमारास, जेव्हा बँकेत ग्राहकांची वर्दळ होती, तेव्हा दोन चेहरा लपविलेले तरुण आत शिरले. त्यांच्या मागोमाग इतर तीन साथीदार हातात पिस्तूल आणि शस्त्रे घेऊन आले. बँकेत शिरताच दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा शाखा व्यवस्थापकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना शस्त्राच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली.
अवघ्या २० मिनिटांत दरोडेखोरांनी कॅश काऊंटर आणि तिजोरीतील ३५ लाख रुपये बॅगेत भरले. जाताना त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्रणालीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. दरोडा टाकल्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून जंगलाच्या दिशेने पसार झाले.
पोलीस यंत्रणा अलर्टवर
घटनेची माहिती मिळताच सिंगरौली पोलीस अधीक्षक आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संपूर्ण जिल्ह्याची नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. "आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल," असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिंगरौलीचे पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दरोडेखोर हेल्मेटमध्ये तर इतर चार उघड्या तोंडाने दिसत आहेत. पोलिसांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
हवेत फायरिंग
दरोडेखोरांनी ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना 'गन पॉइंट'वर घेतले. कोणाचेही धाडस होऊ नये म्हणून त्यांनी बँकेत आणि बाहेर हवेत गोळीबार केला.