निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:17 IST2026-04-17T17:16:21+5:302026-04-17T17:17:24+5:30
Nashik TCS BPO Case: नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खानच्या वकिलांनी जबरदस्तीने धर्मांतराचे आरोप फेटाळले आहेत. निदा खान गर्भवती असून तिला या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
नाशिकमधील टीसीएस बीपीओ युनिटमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानचे वकील बाबा सैय्यद यांनी पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "एफआयआरमध्ये कुठेही जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा उल्लेख नाही, मग निदा खानला मास्टरमाइंड का म्हटले जात आहे?" असा सवाल वकिलांनी केला आहे.
निदा खान कंपनीत एचआर हेड नव्हती, तर ती केवळ 'प्रोसेस असोसिएट' म्हणून काम करत होती. कंपनीच्या निलंबन पत्रातही याच पदाचा उल्लेख आहे, असे वकील म्हणाले. तसेच निदा खान सध्या गर्भवती असून ती भिवंडीतील तिच्या सासरच्या घरी आहे. या तणावामुळे तिचे कुटुंब प्रचंड काळजीत आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
धार्मिक भावना दुखावल्याचाच आरोप
निदावर केवळ धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. तिने कधीही कुणाला धर्मांतरासाठी भाग पाडले नाही किंवा इतर देवी-देवतांचा अपमान केला नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी आपल्या मुलीला यात गोवले जात असून हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असा आरोप कुटुंबाने केला आहे.
तपासाची सद्यस्थिती
नाशिक पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात ९ गुन्हे दाखल केले आहेत. निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून निदा खानवर एका महिला कर्मचाऱ्याला तक्रार करण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. दरम्यान, संबंधित ऑफिस पूर्णपणे बंद न ठेवता काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम तर काहींना ऑफिसमधून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.