इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:43 IST2026-04-17T18:42:37+5:302026-04-17T18:43:40+5:30
Strait of Hormuz opening news: इराणने युद्धबंदीदरम्यान हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही इराणचे ३ तेल टँकर ५० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन रवाना झाले आहेत.

इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
इस्रायल-लेबनॉन युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा सागरी मार्ग सुरक्षित वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, या काळात सर्व व्यापारी जहाजांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली जाईल. ही परवानगी युद्धबंदी संपण्यापर्यंतच असणार आहे, हे देखील इराणने स्पष्ट केले आहे.
व्यापारी जहाजांसाठी विशेष मार्ग
इराणच्या 'पोर्ट्स आणि मॅरिटाइम ऑर्गनायझेशन'ने निर्धारित केलेल्या मार्गावरूनच जहाजांना प्रवास करावा लागेल. समुद्री व्यापार प्रभावित होऊ नये आणि जागतिक पुरवठा साखळी सुरळीत राहावी, यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या बंदरांवर कडक नाकेबंदी लागू केली असतानाही इराणने आपली तेल निर्यात सुरूच ठेवली आहे. 'केपलर' या मॅरिटाइम ट्रॅकिंग फर्मने दिलेल्या माहितीनुसार इराणचे डीप सी, सोनिया-I आणि डायोना हे तीन मोठे तेल टँकर हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत.
नाकेबंदीला बगल
अमेरिकेने सोमवारीच इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध घालण्यासाठी नाकेबंदी केली होती. मात्र, इराणने खार्ग आयलंडवरून भरलेले हे टँकर बुधवारी सुरक्षितपणे बाहेर काढले. १० एप्रिल रोजी 'स्टारला' नावाचा टँकर बाहेर पडल्यानंतरची ही इराणची सर्वात मोठी तेल निर्यात मानली जात आहे.
जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे २०% ते २५% वाहतूक याच मार्गावरून होते. भारत, चीन आणि जपान यांसारख्या आशियाई देशांसाठी हा मार्ग 'जीवनवाहिनी' मानला जातो. भारताचा बहुतांश तेल पुरवठा या मार्गावरून येतो. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील सुरक्षेचा खर्च कमी होईल आणि आगामी काळात भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर किंवा कमी होण्याची शक्यता आहे.