हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:01 IST2026-04-16T19:00:27+5:302026-04-16T19:01:24+5:30
Haryana Congress Suspends 5 MLAs : हरियाणा काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे. शैली चौधरी, रेणू बाला यांच्यासह पाच आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई केली.

हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजप समर्थित अपक्ष उमेदवाराला मतदान करणे हरियाणातील पाच काँग्रेस आमदारांना महागात पडले आहे. काँग्रेस पक्षाने गुरुवारी या पाचही आमदारांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे हरियाणाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे:
१. शैली चौधरी (नारायणगड)
२. रेणू बाला (सडोरा)
३. जर्नेल सिंह (रतिया)
४. मोहम्मद इलियास (पुन्हाना)
५. मोहम्मद इस्रायल (हथीन)
नेमके प्रकरण काय?
मार्च २०२६ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने करमवीर सिंह बौध यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदानादरम्यान काँग्रेसच्या या पाच आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सतीश नांदल यांना मतदान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय, काँग्रेसची ४ मते बाद ठरल्याने पक्षाची स्थिती अधिकच कमकुवत झाली होती.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "पक्षशिस्त ही सर्वोच्च आहे. शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे." माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही या कठोर कारवाईचे समर्थन केले आहे.