आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:25 IST2026-04-16T19:23:32+5:302026-04-16T19:25:42+5:30
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचे लग्न जमवणारे पाओलो जम्पोली आता व्हाईट हाऊसचे पॉवर ब्रोकर बनले आहेत.

आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात अनेक दिग्गज आहेत, पण पाओलो जम्पोली यांचे स्थान सध्या सर्वात वरचे मानले जात आहे. जम्पोली हे सध्या व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या 'ग्लोबल डील' आणि हाय-प्रोफाइल मीटिंग्स फिक्स करण्याचे काम पाहत आहेत. कोणत्याही बड्या उद्योगपतीला किंवा नेत्याला जर राष्ट्राध्यक्षांची भेट घ्यायची असेल, तर जम्पोली हा त्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत पाओलो जम्पोली?
५६ वर्षीय जम्पोली यांचा जन्म इटलीतील मिलान शहरात झाला. १९९० च्या दशकात ते मॉडेलिंग विश्वात एक मोठे नाव होते. त्यांनीच १९९३ मध्ये मेलेनिया यांना मॉडेलिंग क्षेत्रात आणले आणि नंतर त्यांची ओळख डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून दिली. २००५ मध्ये जेव्हा ट्रम्प आणि मेलेनिया यांचे लग्न झाले, तेव्हा जम्पोली यांचा त्यात मोठा वाटा होता. आता तेच जम्पोली व्हाईट हाऊसमध्ये 'विशेष प्रतिनिधी' म्हणून काम करत आहेत.
२० मिनिटांत २० अब्ज डॉलर्सची डील!
जम्पोली यांच्या कामाची पद्धत किती प्रभावी आहे, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. 'फायनान्शिअल टाइम्स'च्या वृत्तानुसार, जम्पोली यांनी काही उद्योजकांना ट्रम्प यांच्याशी केवळ २० मिनिटांसाठी भेटवून दिले. या अवघ्या २० मिनिटांच्या भेटीत तब्बल २० अब्ज डॉलर्सचा (अंदाजे १.६ लाख कोटी रुपये) व्यवहार निश्चित झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात त्यांना "२० मिनिटांत २० बिलियन डॉलरची डील करणारा ब्रोकर" म्हटले जाऊ लागले आहे.
ट्रम्प यांच्या गोटात खास दबदबा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'इनर सर्कल'मध्ये त्यांचे जावई जेरेड कुशनर आणि जुने मित्र स्टीव्ह विटकॉफ यांसारखी मंडळी आहेत. मात्र, जम्पोली यांची मेलेनिया ट्रम्प यांच्याशी असलेली जुनी मैत्री आणि व्यावसायिक चपळता यामुळे त्यांचे पारडे जड आहे. केवळ व्यापारच नव्हे तर २०२६ चा फिफा वर्ल्ड कप आणि २०२८ च्या ऑलिम्पिकच्या संदर्भातही जम्पोली महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.