"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:20 IST2026-04-16T20:15:15+5:302026-04-16T20:20:10+5:30
अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराणला इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितले की, इराणच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे.

"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
अमेरिका आणि इराण यांच्यात एकीकडे युद्धाला पूर्णविराम देण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अमेरिकडून दबाव आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा युद्ध करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य सज्ज असल्याचे विधान केले आहेत.
पेंटागन येथे संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "अमेरिकेने इराणच्या सरकारला समजूतदारपणे पर्याय निवडण्याचा आग्रह केला आहे, आणि हेही सांगितले आहे की, जर इराणने चुकीचा निर्णय घेतला आणि कोणत्याही तोडग्यावर सहमत झाला नाही, तर अमेरिकेकडे पुन्हा युद्ध सुरू करण्यासाठी पुरेसे सैन्य आहे."
हेगसेथ असेही म्हणाले की, "इराण गमावलेली सैन्य क्षमता लगेच मिळवू शकत नाही आणि आम्ही इराणच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत."
'आम्ही दिवसेंदिवस आणखी शक्तीशाली बनत आहोत'
माध्यमांशी बोलताना हेगसेथ म्हणाले की, "अमेरिका आणि इराणची क्षमता एकसारखी नाहीये. ही काही बरोबरीची लढाई नाहीये. आम्ही दिवसेंदिवस आणखी शक्तीशाली बनत आहोत. आणि इराण त्यांचे शिल्लक राहिलेले लॉन्चर आणि मिसाईल्स आता बाहेर काढत आहे, ज्यांना तुम्ही बदलूही शकत नाही."
"अमेरिकेचे सैन्य आता पूर्वीपेक्षा कित्येकपट जास्त ताकदीनिशी सज्ज आहे. आम्ही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय. त्यांच्या आदेशानंतर एक बटण दाबताच कारवाई सुरू होईल", असे हेगसेथ म्हणाले.