‘लिव्ह इन'वर भरोसा नाय का?... 'या' ५ कारणांमुळे भारतीय तरुणाईचा 'लिव्ह इन'ला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 02:52 PM2018-03-29T14:52:21+5:302018-03-29T15:00:23+5:30

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असं नेहमीच म्हटलं जातं. परंतु आजकालची तरुण पिढी याच प्रेमाखातर पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करू लागली आहे. खरं तर लिव्ह इन रिलेशनशिप ही त्यातूनच जन्माला आलेली पाश्चिमात्यांची संकल्पना आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुणाईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं फॅड काही प्रमाणात कमी झालेलं दिसतंय, तर दुसरीकडे भारतीय संस्कृती त्यांना जास्त आपलीशी वाटू लागली आहे. लिव्ह इनपेक्षा आता लग्न करून एकत्र राहण्याला जोडपी जास्त पसंती देतायत.

१) समाजाची अमान्यता -लिव्ह इन रिलेशनशिप या संस्कृतीला अद्यापही समाजानं स्वीकारलेलं नाही. त्यामुळेच तरुण मुलं-मुली लिव्ह इनमध्ये राहण्यास कचरतात. समाजात या प्रथेला मान्यता नसल्यानं या संकल्पनेकडे पाठ फिरवली जाते. तसेच समाजाचा लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट असल्यानं या प्रथेला झिडकारलं जातं.

२) आवडी निवडींशी जुळवून घेणं कठीण - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहताना एकमेकांना आवडीनिवडी सांभाळून घ्याव्या लागतात. अशातच जोडीदाराच्या चांगल्या व वाईट सवयींशी जुळवून घेणं कठीण जातं.

३) स्वातंत्र्य संपण्याची भीती - जोडीदारासोबत लिव्ह इनमध्ये राहिल्याने स्वत:साठी मोकळा वेळ मिळत नसल्याची दोघांची भावना असते. त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक गोष्टी एकमेकांकडे शेअर करण्याचं दोघेही शक्यतो टाळतात.

४) मित्रमंडळीशी जिव्हाळा - आजकाल तरुणांना सर्वात जास्त वेळ मित्रमंडळींसोबत व्यतीत करावासा वाटतो. परंतु रात्री पार्टी करून उशिरा घरी येणे, नाईट आऊट यांसारख्या गोष्टी जोडीदाराला रुचत नाहीत. तसेच एकमेकांना विचारात न घेता काही गोष्टी करणंही लिव्ह इनमध्ये त्रासदायक ठरतं.

५) नात्यात नको असलेली बांधिलकी - नातं शेवटपर्यंत टिकून राहील की नाही याबाबत दोघांनाही शाश्वती नसते. नात्यात गुरफटून राहून ते शेवटपर्यंत टिकवणं हे जोडीदाराला महत्त्वाचं वाटत नाही. एकमेकांना समजावून घेताना ब-याचदा जोडप्यांमध्ये वाद होतात. त्यामुळेही नात्यातील बांधिलकी टिकून राहत नाही.