निजामाच्या अस्सल हिऱ्यांच्या अंगठीचा लिलाव; तब्बल 45 कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 05:05 PM2019-06-21T17:05:51+5:302019-06-21T17:09:32+5:30

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये बुधवारी भारतीय दागिन्यांच्या लिलावामध्ये पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या लिलावामध्ये आकर्षणाचे मुख्य केंद्र होते निजाम मीर उस्मान अली खान यांची अंगठी, नेकलेस आणि तलवार. 52.58 कॅरटच्या अस्सल हिऱ्यांच्या अंगठीला तब्बल 45 कोटींची बोली लावण्यात आली. या अंगठीवर जगप्रसिद्ध हिऱ्यांची खाण गोलकुंडामधून काढलेले हिरे लावलेले आहेत.

निजामाच्या तलवारीला 13.4 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. या लिलावात निजामाच्या खजान्यातील खास हारावरही लोकांचे लक्ष होते. हिऱ्यांनी लगडलेल्या या हारासाठी 17 कोटी रुपये मोजण्यात आले. या हाराला 33 हिरे लावण्यात आले होते. या हाराला 10.5 कोटी रुपये येतील असा अंदाज होता. मात्र, तो चुकीचा ठरला.

यावेळी निजाम परिवाची लिलाव प्रक्रियेवर नजर होती. दिवंगत निजाम मीर उस्‍मान अली खान यांचे नातू मीर नजफ अली खान यांनी सांगितले की, जेव्हा पांढऱ्या मोत्यांच्या हाराची बोली लावण्यात आली तेव्हा त्यांनी जवळपास ओरडच मारली. यावेळी 17 कॅरेटचा गोलकुंडाचे 'अर्काट 2' हिरा 23.5 कोटींना विकला गेला.

लिलावांचे आयोजन करणारी संस्था क्रिस्टीनुसार जवळपास 400 वस्तूंचा लिलाव करण्यात आला. यामध्ये 758 कोटी रुपये जमा झाले. ही भारतीय कला आणि मुघलांच्या वस्तूंची सर्वाधिक संख्या आहे.

हा लिलाव 12 तास चालला. या लिलावामध्ये भारतासह जवळपास 44 देशांच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता. जयपूर, इंदोर आणि बडोद्याचे शाही परिवारही या लिलावामध्ये सहभागी झाले होते.