Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या ठीक एक दिवस आधी सोन्याच्या किमतीत घट झाली असून, सणानिमित्त खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सामान्यतः या सणापूर्वी सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते, परंतु यंदा बाजारपेठेत उलट चित्र पाहायला मिळत आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीही स्वस्त झाली आहे.
दिल्ली, मुंबई ते चेन्नईपर्यंत दर घसरले
१८ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५४,३४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला. मुंबई, कोलकाता, पुणे आणि बंगळुरूमध्ये हा दर सुमारे १,५४,१९० रुपयांच्या आसपास राहिला, तर चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्यासाठी १,५५,०१० रुपये प्रति १० ग्रॅम भाव आहे. २२ कॅरेट सोन्याचा विचार करता, दिल्लीत हा भाव सुमारे १,४१,४९० रुपये आणि मुंबई-कोलकात्यात १,४१,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसंच, १८ कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत सुमारे १,१५,७५५ रुपये आणि मुंबई-कोलकात्यात १,१५,६४२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
एका दिवसात मोठी घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात एक दिवसापूर्वीच सोन्याच्या किमतीत सुमारे १,६०० रुपयांची घट नोंदवण्यात आली होती. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. १८ एप्रिल रोजी चांदीचा भाव सुमारे २,६४,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, तर मागील सत्रात चांदीच्या दरात ५,७०० रुपयांची घट झाली होती.
किमती का घसरल्या?
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीतील घट आणि भू-राजकीय तणावातून मिळालेला थोडा दिलासा ही यामागची मुख्य कारणं आहेत. इस्रायल-लेबनॉनमधील युद्धविराम आणि अमेरिका-इराणमधील समेटाच्या आशेमुळे गुंतवणूकदारांचा कल कमी झाला आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची असलेली मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे.
