NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:47 IST2026-04-14T13:43:24+5:302026-04-14T13:47:01+5:30

जाणून घ्या NEFT, RTGS, IMPS आणि UPI मधील फरक...

Payment Mode: आजच्या डिजिटल युगात पैसे पाठवणे आणि घेणे अत्यंत सोपे झाले आहे. एका क्लिकवर पैशांची देवाण-घेवाण केली जाते. मात्र, NEFT, RTGS, IMPS आणि UPI यांसारख्या विविध पेमेंट पद्धतींमुळे अनेकदा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. कोणती सेवा किती वेगवान आहे, किती सुरक्षित आहे आणि कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय योग्य ठरतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.

NEFT म्हणजे काय? NEFT (National Electronic Funds Transfer) ही एक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा आहे, जी Reserve Bank of India द्वारे चालवली जाते. या प्रणालीत व्यवहार “बॅच प्रोसेसिंग” पद्धतीने होतात, म्हणजेच ठराविक वेळांनी व्यवहारांची प्रक्रिया केली जाते. ही सेवा 24x7, म्हणजेच कधीही उपलब्ध असते. यात किमान रक्कम मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कितीही पैसे पाठवू शकता. ही सेवा वापरण्यासाठी IFSC कोड आवश्यक आहे.

RTGS म्हणजे काय? RTGS (Real Time Gross Settlement) ही मोठ्या रकमेच्या तात्काळ व्यवहारांसाठी वापरली जाणारी सेवा आहे. यात व्यवहार “रिअल-टाइम”मध्ये पूर्ण होतो. मात्र, याद्वारे किमान ₹२ लाख रुपये पाठवणे गरजेचे आहे. यात तत्काळ सेटलमेंट होते आणि ही सेवादेखील 24x7 उपलब्ध आहे. मोठ्या आणि तातडीच्या व्यवहारांसाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.

IMPS म्हणजे काय? IMPS (Immediate Payment Service) ही तत्काळ पैसे ट्रान्सफर करणारी सेवा असून, ती National Payments Corporation of India (NPCI) द्वारे चालवली जाते. ही 24x7 उपलब्ध असणारी सेवा आहे. यात मोबाइल नंबर, MMID, अकाउंट नंबर किंवा आधारद्वारे ट्रान्सफर केले जाते. लहान ते मध्यम रकमेच्या त्वरित व्यवहारांसाठी ही सेवा उपयुक्त आहे.

UPI म्हणजे काय? UPI (Unified Payments Interface) ने भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीत क्रांती घडवली आहे. ही सेवा देखील National Payments Corporation of India द्वारे चालवली जाते. यात VPA (Virtual Payment Address) द्वारे व्यवहार केले जातात. बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, फोन नंबर अथवा QR कोडद्वारे पेमेंट्स शक्य आहे. PhonePe, Google Pay, BHIM...अशा लोकप्रिय अॅपद्वारे पेमेंट केली जाते.