हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:36 IST2026-04-14T14:35:50+5:302026-04-14T14:36:33+5:30
अमेरिकेत कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेशातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला आहे.

फोटो - ndtv.in
अमेरिकेत कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेशातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला आहे. २६ वर्षांचा हा तरुण आपल्या वाढदिवशी म्हणजेच शनिवार ११ एप्रिल रोजी मित्रांसोबत फिरायला गेला होता, मात्र एका धबधब्यावर झालेल्या दुर्घटनेत त्याचा जीव गेला. पाण्यातील धोकादायक परिस्थितीमुळे हा अपघात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सिंगिरेड्डी साई श्रीहरीकृष्ण असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो विजयनगरम जिल्ह्यातील पिरीडी गावाचा रहिवासी होता.
श्रीहरीकृष्ण हा मूळचा विजयनगरम जिल्ह्यातील पिरीडी गावचा होता. अमेरिकेत मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर त्याने अलीकडेच सेंट लुईस येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वीच ही नोकरी मिळाली होती आणि तो आपल्या करिअरच्या सुरुवातीमुळे खूप आनंदी होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
वाढदिवशीच झाला घात
ही घटना शनिवारी घडली, जेव्हा श्रीहरीकृष्णचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो आपल्या मित्रांसह कॅलिफोर्नियातील एका धबधब्यावर गेला होता. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोहण्याची आवड होती आणि तो आनंदाने पाण्यात उतरला. मात्र काही मिनिटांतच परिस्थिती बिघडली आणि तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला यश आलं नाही. त्यानंतर आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह बाहेर काढला.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
या तरुण इंजिनिअरच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वडील सिंगिरेड्डी श्रीनिवास राव आणि आई रामादेवी असा परिवार आहे. आता त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. TDP आमदार आर.व्ही.एस.के.के. रंगाराव यांनी आंध्र प्रदेशचे मंत्री कोंडापल्ली श्रीनिवास यांच्याशी चर्चा करून मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्याची विनंती केली आहे.