डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:07 IST2026-04-14T17:05:33+5:302026-04-14T17:07:02+5:30

होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी चीन आणि इराणने तोडली आहे.

Donald Trump's 'Brahmastra' fails! Chinese-Iranian ships successfully pass through Hormuz, breaking US blockade | डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट

डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट

मध्य-पूर्व आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेली सर्वात मोठी खेळी सपशेल अपयशी ठरली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने केलेली नाकेबंदी तोडून चीन आणि इराणच्या जहाजांनी यशस्वीपणे प्रवास केला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या लष्करी शक्तीवर आणि निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, दुसरीकडे या जागतिक वादात भारताची १५ जहाजे अडकून पडल्याने भारताची चिंता वाढली आहे.

चीनने 'असं' तोडलं अमेरिकेचं चक्रव्युह!

१३ एप्रिल रोजी संध्याकाळी अमेरिकन सैन्याने होर्मुजमध्ये कडक नाकेबंदी जाहीर केली होती. प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजाची तपासणी करण्याचा इशारा दिला होता. मात्र, भारताच्या वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता चीनच्या 'रिच स्टार्री' या जहाजाने ही नाकेबंदी अक्षरशः पायदळी तुडवली. या जहाजावर २.५ लाख बॅरल मेथनॉल लदलेले होते. विशेष म्हणजे, या जहाजाच्या मालकावर अमेरिकेने आधीच निर्बंध घातले असतानाही अमेरिकन नेव्ही या जहाजाला रोखू शकली नाही. चीनपाठोपाठ इराणच्याही एका जहाजाने नाकेबंदीतून वाट काढली, ज्यामुळे अमेरिकेच्या दाव्यांमधील हवाच निघून गेली आहे.

भारताची १५ जहाजे समुद्रातच अडकली!

इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षात भारताला मोठा फटका बसला आहे. इराणने 'भारतीय जहाजांवर आमची कोणतीही बंदी नाही आणि आम्ही टोलही आकारत नाही' असे स्पष्ट केले असले, तरी अमेरिकेच्या नाकेबंदीच्या भीतीमुळे भारताची १५ जहाजे होर्मुजमध्ये अडकली आहेत.

अडकलेल्या जहाजांमध्ये कच्च्या तेलाचे ६ टँकर (ज्यात ५ पूर्ण भरलेले आहेत), एलएनजी आणि एलपीजीचे प्रत्येकी एक जहाज, तसेच कंटेनर आणि कार्गो शिप्सचा समावेश आहे. भारतीय नौदलाची या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू आहे. ११ एप्रिलनंतर भारताचे एकही मोठे जहाज या भागातून पुढे जाऊ शकलेले नाही.

ट्रम्प जागतिक राजकारणात एकटे पडले?

एकूणच या मोहिमेत अमेरिका एकाकी पडताना दिसत आहे. ब्रिटनसह अनेक नाटो देशांनी आपली सेना होर्मुजमध्ये पाठवण्यास नकार दिला आहे. त्यातच चीन आणि इराणच्या जहाजांनी नाकेबंदी झुगारल्याने ट्रंप यांच्या धोरणात्मक पराभवाची चर्चा रंगली आहे. आता ही परिस्थिती कधी निवळते आणि भारतासह जगाला होणारा तेल-गॅस पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : ट्रंप का 'ब्रह्मास्त्र' विफल: चीन, ईरान के जहाजों ने अमेरिकी नाकेबंदी तोड़ी।

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में अमेरिकी नाकेबंदी विफल, चीनी-ईरानी जहाज निकले। भारत के 15 जहाज फंसे, चिंता बढ़ी। ट्रंप अलग-थलग पड़े।

Web Title : Trump's 'Brahmashtra' fails: China, Iran ships break US blockade.

Web Summary : US blockade in Hormuz Strait fails as Chinese and Iranian ships pass. India's 15 ships are stranded, raising concerns. Trump faces isolation.