आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:38 IST2026-04-14T18:28:14+5:302026-04-14T18:38:41+5:30
Who is Samrat Chaudhary Bihar: वेगवेगळ्या पक्षात राहून राजकीय ताकद वाढवलेल्या सम्राट चौधरी यांनी आता मोठी झेप घेतली. ते आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

नितीश कुमारांचे मुख्यमंत्री म्हणून पर्व संपले. त्यांच्या राजीनाम्याबरोबरच बिहारमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा रस्ता मोकळा झाला. सम्राट चौधरी यांना विधिमंडळ नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे तेच बिहारचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे.

नव्वदच्या दशकात सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलेल्या सम्राट चौधरींचा प्रवास रंजक राहिला आहे. सम्राट चौधरी ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले आहेत, ना ते मूळचे भाजपाचे आहेत. वडील शकुनी चौधरी यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळालेल्या सम्राट चौधरींनी काँग्रेस ते भाजपा अशा सगळ्याच पक्षात काम केले आहे.

बिहारच्या राजकारणातील एक ओबीसी चेहरा म्हणून ओळख असलेल्या सम्राट चौधरींनी १९९० मध्ये राजकीय काम सुरू केले. लाल प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलातून ते राजकारणात सक्रीय झाले.२२व्या १९९९ मध्ये ते राबडी देवी यांच्या सरकारमध्ये सर्वात तरुण मंत्री बनले. शकुनी चौधरी समता पक्षातून आरजेडीमध्ये आले. त्याबदल्यात लालू प्रसादांनी सम्राट चौधरींना विधान परिषदेवर घेत मंत्री केलं होतं. पण त्यांच्या वयावरून वाद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडल्यानंतर सम्राट चौधरींनी नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त पक्षात प्रवेश केला. २०१४ नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडले आणि जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी सम्राट चौधरी कॅबिनेट मंत्री बनले. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री बनले, पण त्यावेळी सम्राट चौधरींना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही. आणि नाराज झालेल्या चौधरींनी जेडीयूला राम राम केला.

सम्राट चौधरींनी नंतर भाजपात प्रवेश केला. २०१८ मध्ये कमळ हाती घेतल्यानंतर त्यांचा सत्ताकारणातील आलेख वाढत गेला. भाजपाच्या मातीत त्यांची वाढ वेगाने झाली. २०१८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले सम्राट चौधरी आता मुख्यमंत्री बनले आहेत.

सम्राट चौधरी जेव्हा भाजपामध्ये आले होते, तेव्हा त्यांना ग्राम विकास राज्यमंत्री बनवले गेले होते. २०२२ मध्ये नितीश कुमारांनी भाजपाची साथ सोडली तेव्हा चौधरींना विधान परिषद विरोधी पक्षनेता करण्यात आले. २०२३ मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर नितीश कुमारांची जेडीयू आणि भाजपा एकत्र आली. तेव्हा चौधरी थेट उपमुख्यमंत्री बनले.

२०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून सम्राट चौधरींना लक्ष्य केलं गेलं. पण, सत्तेत येताच भाजपाने पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं. आता त्यांना मुख्यमंत्री करण्यात येणार आहे. चौधरी हे कोइरी समुदायातून येतात. पण, त्यांनी भाजपामध्ये आल्यानंतर घेतलेली झेप सगळ्यांनाच अवाक् करणारी आहे. त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांना मागे टाकत ही सत्तेचं शिखर गाठलं आहे.

















