शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 21:36 IST2026-04-14T21:35:22+5:302026-04-14T21:36:36+5:30

एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. पण, मृत्यूनंतरही त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना ताटकळत बसावे लागले. 

Farmer dies, relatives wait for two hours for postmortem; Incident in Beed district | शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना

शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना

Beed News: ५२ वर्षीय शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मंगळवारी (१४ एप्रिल) दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आयुष्य संपवले. बीड तालुक्यातील बोरखेड येथे ही घटना घडली. त्यांचा मृतदेह लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला, पण नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी दोन तास ताटकळत उभे राहावे लागले.

लक्ष्मण क्षीरसागर यांच्यावर कर्ज होते अशी माहिती मिळाली. कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. 

घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश परझने, मन्सूर शेख व अविनाश घुंगरड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. 

लिंबागणेश आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय नसल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे

मृतदेह आरोग्य केंद्रात आणल्यानंतर तिथे शवविच्छेदनासाठी आवश्यक साधनसामग्री आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांनी मृतदेह नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 

या सर्व गोंधळात आणि कागदी प्रक्रियेत दोन तास विलंब झाल्याने मयताचे नातेवाईक रामदास क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, दशरथ क्षीरसागर आणि सरपंच सुनील अनपट यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

अधिकाऱ्यांची कबुली अन् संताप

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत कर्मचाऱ्यांची व साहित्याची कमतरता आहे", अशी कबुली दिली. 

अखेर नेकनूर येथे शवविच्छेदन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकरी आत्महत्या सारखी संवेदनशील घटना घडल्यानंतरही आरोग्य प्रशासनाची ही असंवेदनशीलता पाहून बीड जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बोरखेड ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title : बीड में किसान ने की आत्महत्या; पोस्टमार्टम के लिए दो घंटे इंतजार

Web Summary : कर्ज से परेशान होकर बीड, महाराष्ट्र में एक 52 वर्षीय किसान ने आत्महत्या कर ली। प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में सुविधाओं की कमी के कारण पोस्टमार्टम के लिए परिवार को दो घंटे इंतजार करना पड़ा, जिससे ग्रामीण स्वास्थ्य सेवा पर आक्रोश फैल गया।

Web Title : Beed Farmer Suicide: Family Waits Two Hours for Postmortem

Web Summary : Burdened by debt, a 52-year-old farmer in Beed, Maharashtra, committed suicide. His family faced a two-hour delay for the postmortem due to a lack of facilities at the primary health center, sparking outrage over inadequate rural healthcare.