तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:17 IST2026-04-14T12:15:54+5:302026-04-14T12:17:13+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शोनंतर पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

फोटो - tv9hindi
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शोनंतर पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बांकुरा मोड परिसरात ही घटना घडली असून, दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधील वादाचं रूपांतर अचानक हिंसक संघर्षात झालं. या चकमकीत दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बांकुरा मोड भागात दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रूपांतर हाणामारीत झालं. यामध्ये दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केला. घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने दुर्गापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पश्चिमचे भाजपा उमेदवार लक्ष्मण चंद्र घोरुई आणि टीएमसी उमेदवार कवी दत्ता यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळाला. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
भाजपाचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप
भाजपाचे नेते अभिजित दत्ता यांनी आरोप केला आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला. ते म्हणाले की, "अमित शाह यांच्या रोड शोमधील अलोट गर्दी पाहून टीएमसी घाबरली आहे. सुमारे ८-१० टीएमसी कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. आमचा कार्यकर्ता घरी परतत असताना त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्या घराची तोडफोड केली आणि त्याच्या आईलाही धक्का दिला."
"बंगालची जनता आता टीएमसीसोबत नाही"
"भाजपा येत्या महिनाभरात सरकार स्थापन करेल आणि या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देई" असंही दत्ता यांनी ठणकावून सांगितलं. तसेच २४ तासांच्या आत आरोपींना अटक न झाल्यास दुर्गापूरमध्ये मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. "या हल्ल्याला स्थानिक जनतेनेही प्रत्युत्तर दिले असून बंगालची जनता आता टीएमसीच्या पाठीशी नाही" असंही त्यांनी नमूद केलं.