पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:36 IST2026-04-14T14:35:47+5:302026-04-14T14:36:34+5:30
इराण आणि अमेरिका युद्धाच्या छायेत असताना चीनने मोठी भूमिका बजावली आहे. शी जिनपिंग यांनी शांततेचे ४ फॉर्म्युले मांडले असून पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता चीन मध्यस्थी करणार आहे.

पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव निवळण्यासाठी आता जगातील महासत्ता असलेल्या चीनने पुढाकार घेतला आहे. पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांचे मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतः मैदानात उतरले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या क्राउन प्रिन्सशी झालेल्या भेटीत जिनपिंग यांनी मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चार कलमी शांती फॉर्म्युला मांडला आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी सार्वजनिकरित्या केलेले हे पहिलेच विधान असल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचे प्रयत्न हवेत विरले!
यापूर्वी इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये मोठी बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीत ठोस काहीच निष्पन्न न झाल्याने पाकिस्तानला अपयश आले. आता चीनने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केल्याने या संघर्षाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे जिनपिंग यांचा ४ कलमी फॉर्म्युला?
१. जंगलराज नको: जिनपिंग यांनी आपल्या भाषणात कडक शब्दात सांगितले की, जग आता पुन्हा 'जंगलराज'कडे जाऊ शकत नाही. शक्तिशाली देशांनी संयम पाळला पाहिजे आणि एकमेकांवर होणारे हल्ले त्वरित थांबवले पाहिजेत.
२. इराणच्या सत्तेला मान्यता द्या: शांतता प्रस्थापित करायची असेल, तर इराणच्या सरकारला जगाने स्वीकारावे लागेल. इराण हा एक सार्वभौम देश असून, तिथल्या राजवटीला मान्यता दिल्याशिवाय कोणतीही चर्चा यशस्वी होऊ शकत नाही, असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले.
३. हल्ल्यांचा कट थांबवा: आखाती देशांनी एकमेकांवर हल्ले करणे किंवा तसा कट रचणे थांबवले पाहिजे. अशा कृत्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
४. दबाव नव्हे, तर संवाद हवा: कायमस्वरूपी शांततेसाठी एकमेकांवर दबाव टाकण्यापेक्षा संवाद वाढवणे गरजेचे आहे. केवळ चर्चेतूनच या संकटावर तोडगा निघू शकतो, यावर चीनने जोर दिला आहे.
चीनची भूमिका महत्त्वाची का?
चीन हा इराणचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अमेरिकेने निर्बंध लादलेले असूनही चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत जिनपिंग यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत धोरणात्मक मानले जात आहे. इराणला चर्चेसाठी तयार करण्याची ताकद केवळ चीनकडे असल्याने आता संपूर्ण जगाचे लक्ष जिनपिंग यांच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.