इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:43 IST2026-04-14T15:37:57+5:302026-04-14T16:43:22+5:30
जमिनीवरील दबदबा बनवण्याऐवजी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनीवर आपली पकड मजबूत करून चीनची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे.

इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
वॉशिंग्टन - अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात एक संरक्षण करार होणार असून त्याचा परिणाम चीनवर होणार आहे. इंडोनेशिया अमेरिकेला त्यांची हवाई हद्द वापरण्याची परवानगी देऊ शकतो. नुकतीच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यात वॉशिंग्टनमध्ये बैठक पार पडली. या दोन्ही देशांमधील संरक्षण करार मलाक्का सामुद्रधुनीवरून चीनच्या निर्माण झालेल्या तणावाशी थेट संबंधित आहे. मलाक्का सामुद्रधुनी मलेशिया आणि इंडोनेशियाचे सुमात्रा बेट यांच्या मध्यभागी आहे. ती हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडते. तिची लांबी अंदाजे ९०० किलोमीटर आहे परंतु काही ठिकाणी तिची रुंदी ३ किलोमीटरपेक्षा कमी आहे.
चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांनी वीस वर्षांपूर्वीच चीनला याबद्दल इशारा दिला होता. २००३ मध्ये तत्कालीन चिनी राष्ट्रपतींनी 'मलाक्का पेचप्रसंग' असा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले होते की, इतर शक्ती मलाक्काची नाकेबंदी करून चीनच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळे करू शकतात. त्यांचा रोख भारत आणि अमेरिकेकडे होता. चीन आजही आपल्या तेल आणि वायूचा बहुतांश भाग मलाक्कामार्फतच आयात करतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रासंदर्भातील वाटाघाटी हा काही योगायोग नाही.
'मलाक्का'हून चीनला कसं घेरणार?
अमेरिकेने इंडोनेशियासोबतचे आपले संरक्षण संबंध नेहमीच 'प्रमुख संरक्षण भागीदारी' म्हणून राजनैतिकरित्या सादर केले आहेत. अधिक बारकाईने पाहिल्यास त्यातून एक वेगळाच उद्देश दिसून येतो. हिंद महासागर आणि दक्षिण चीन समुद्रादरम्यानच्या सर्व घडामोडींचे अधिक व्यापक आणि स्पष्ट चित्र इंडोनेशियाला आणि त्यामार्फत अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांना पुरवणे हा यामागील उद्देश आहे. संकटाच्या काळात अमेरिका मलाक्का सामुद्रधुनीची पूर्णपणे नाकेबंदी करून चीनला गुडघे टेकायला लावू शकते. आपली नौदल शक्ती पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न आहे असं अमेरिकन संरक्षण तज्ञ जेम्स थ्रोन यांनी लिहिले आहे.
आखाती देश आणि आफ्रिकेतील तेल समुद्रमार्गे चीनपर्यंत पोहोचते. सर्वात लहान आणि स्वस्त मार्ग भारतातून पुढे जात मलाक्का सामुद्रधुनीतून आणि इंडोनेशियाच्या वळसा घालून जातो आणि त्यानंतर अशा भागांमधून जातो जिथे अमेरिकेचे नौदल आपल्या मित्र राष्ट्रांसह अनेक वर्षांपासून उपस्थित आहे. येथून अमेरिकेचे नौदल चीनकडे जाणाऱ्या जहाजांवर पाळत ठेवते. यामुळे चीनवर एक अदृश्य दबाव निर्माण होतो ज्याचा उपाय आजपर्यंत ते शोधू शकले नाहीत. इराणने होर्मुझ स्ट्रेटला ब्लॉक करून हा सागरी मार्ग युद्धातलं शस्त्र बनवले आहे. ट्रम्पदेखील इंडोनेशियाबाबत ते धोरण अवलंबत आहेत. जमिनीवरील दबदबा बनवण्याऐवजी सागरी मार्ग आणि सामुद्रधुनीवर आपली पकड मजबूत करून चीनची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे.
दरम्यान, चीनने मागील २ दशकांत या जाळातून निघण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मध्य आशिया आणि रशियाहून पाइपलाईन विस्तारली. म्यानमारमधून एक कॉरिडॉर बांधला आणि ग्वादरपासून जिबूतीपर्यंत 'बंदरांची साखळी' तयार केली. तरीही ते मलाक्काच्या पेचप्रसंगावर मात करण्यात अयशस्वी ठरले. तेल आणि गॅस निर्यातीसाठी भूमार्गांचा वापर क्वचितच केला जातो आणि ते खूपच महागडेही आहेत. चीनची बहुतेक ऊर्जा अजूनही टँकरमार्फत येते आणि दक्षिण पूर्व आशियाच्या सागरी मार्गांनी प्रवास करते, म्हणूनच इंडोनेशिया इतके महत्त्वाचे आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांचे हे आणखी एक पाऊल आहे, ज्यामुळे चीन नक्कीच अस्वस्थ होईल.