काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
Updated:April 14, 2026 18:34 IST2026-04-14T18:16:11+5:302026-04-14T18:34:12+5:30
काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

उन्हाळा सुरू झाला की, लोक आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करू लागतात ज्या शरीराला थंडावा देण्यासोबतच हायड्रेटेड (पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे) ठेवतात. काकडी ही त्यापैकीच एक आहे, जी प्रत्येक घरात सॅलडच्या रूपात आवडीने खाल्ली जाते. मात्र, काकडी खाण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते, ज्यामुळे त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
जर काकडी योग्य पद्धतीने खाल्ली तर ती केवळ शरीराला थंडावाच देत नाही, तर त्वचा आतून निरोगी आणि चमकदार बनवते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
काकडीमध्ये साधारणपणे ९० ते ९५ टक्के पाणी असतं, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. शरीरात पाण्याची कमतरता नसल्यास रक्तभिसरण सुधारतं आणि पोषक तत्व त्वचेपर्यंत सहज पोहोचतात. यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येते.
काकडी खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे. जर काकडी सेंद्रिय असेल, तर ती सालीसकट खाणं अधिक फायदेशीर ठरतं. सालीमध्ये भरपूर फायबर असतं, जे पचनसंस्था मजबूत करतं आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतं.
दररोज काकडीचा रस प्यायल्याने शरीरातील साठलेले विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर फिट राहतं.
कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात खाणंच हिताचं असतं. चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त काकडी खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात:
जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने पोटात गॅस, अपचन किंवा जडपणा जाणवू शकतो. काकडीतील काही घटक पचन प्रक्रिया मंदावू शकतात, म्हणून तिचे सेवन संतुलित असावे.
अनेकजण फ्रिजमधून काढलेली अतिशय थंड काकडी लगेच खातात, जे पोटासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त थंड गोष्टी खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि पोटदुखी किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
काकडी फ्रिजमधून काढल्यानंतर काही वेळ नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यावी आणि मगच खावी. काकडी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ आहे, पण ते खाताना स्वच्छ धुणं, सालीसकट खाणं (शक्य असल्यास) आणि प्रमाण याचं भान ठेवणं तितकंच गरजेचं आहे.