तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर कशी होती अवस्था? पहिल्यांदाच विजय वर्माचा खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:31 IST2026-04-14T18:28:37+5:302026-04-14T18:31:23+5:30
तमन्ना आणि विजय या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपवर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला विजय?

तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर कशी होती अवस्था? पहिल्यांदाच विजय वर्माचा खुलासा, म्हणाला...
अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या दोन वर्षांच्या नात्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आता सर्वत्र पसरल्या आहेत. २०२३ मध्ये सुरू झालेलं त्यांचं रिलेशनशिप २०२५ मध्ये संपलं. दोघांनीही अधिकृतपणे यावर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ब्रेकअपच्या काळाबद्दल भाष्य केले. जेव्हा त्याने स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते. तो म्हणाला, "आम्ही जेव्हा मोठे होत होतो, तेव्हा सार्वजनिक व्यासपीठावर कोणाबद्दल तरी वाईट बोलणे चुकीचे मानले जायचे. जो वाईट बोलायचा, त्यालाच दोष दिला जायचा. आता मात्र सर्व काही उलट चित्र बघायला मिळतं. जो शिवीगाळ करतोय, त्याला कोणी काहीच बोलत नाही; पण ज्याला शिव्या मिळत आहेत, त्याच्या विरोधातच लोक अधिक बोलतात. त्याला समर्थन देणारे कमी असतात."
विजय वर्माने पुढे सांगितले, "जग खूप वेगाने बदलत आहे आणि मी त्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाहीये. संपूर्ण संस्कृतीत बदल झाला आहे. लोक ज्या पद्धतीने बोलतात आणि कमेंट्स लिहितात, ते खूप टोकाचे, रोखठोक आणि अनेकदा वैयक्तिक पातळीवरचे असते. अनेकदा स्वतःच्या मनाला येईल त्या गोष्टी बोलल्या जातात आणि खोट्या बातम्या लिहिल्या जातात."
यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये 'एचटी सिटी'ला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्माने प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्याच्या आपल्या निर्णयावर भाष्य केले होते. तो म्हणाला होता, "मला पूर्णपणे गप्प राहायचे होते, पण तसे करणे शक्य नाही. 'IC 814: द कंदहार हायजॅक'नंतर मी मीडियाला एकही मुलाखत दिली नाही, तरीही मी सगळीकडे दिसतो आणि हे सर्व माझ्या हाताबाहेर आहे."
त्याने पुढे नमूद केले, "पण ही गोष्ट अशी काहीतरी आहे ज्यातून आमच्या पिढीला जावंच लागेल. दररोज तुमच्या निर्णयांची आणि आयुष्याची परीक्षा केली जाते. मला थोड्या विश्रांतीची गरज होती, अधिक शांतता हवी होती, पण तरीही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या."