7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 20:29 IST2026-04-14T20:29:14+5:302026-04-14T20:29:44+5:30
Indian Student Missing in US: कोण आहे मायूषी भगत? सात वर्षांपासून सुरू आहे शोध

7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
Mayushi Bhagat: अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातून बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थिनीचा शोध सहा वर्षांनंतरही लागलेला नाही. या प्रकरणात महत्त्वाची माहिती देणाऱ्यांसाठी Federal Bureau of Investigation (FBI) ने 10,000 डॉलर्स (सुमारे ₹8 लाख) इतक्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
2019 पासून बेपत्ता; शोधकार्य सुरूच
मूळ गुजरातच्या वडोदराची रहिवासी असलेली मायूषी भगत 2016 मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. ती सुरुवातीला हॅम्पस्पीअर विद्यापीठात शिकत होती, नंतर न्यूयॉर्क इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिक्षणासाठी गेली. 29 एप्रिल 2019 रोजी ती न्यू जर्सी येथील तिच्या राहत्या घरातून बाहेर पडली आणि अचानक बेपत्ता झाली.
The #FBI offers a reward of up to $10,000 for info leading to the location or recovery of Mayushi Bhagat, and the identification, arrest, and conviction of those responsible. She was last seen in the evening hours of April 29, 2019, leaving her Jersey City, NJ apartment:… pic.twitter.com/CDt1WJjLhM
— FBI (@FBI) April 13, 2026
कुटुंबाला संशयास्पद मेसेज
मायूषी बेपत्ता झाल्यानंतर 1 मे 2019 रोजी तिच्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर एक संदेश आला होता, ज्यात ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मेसेजची भाषा तिच्या नेहमीच्या शैलीशी जुळत नव्हती. कुटुंबीयांनी हा मेसेज संशयास्पद असल्याचे सांगितले. तेव्हापासून मायूषीचा शोध सुरू आहे.
FBI कडून तपशील जाहीर
FBI ने 13 एप्रिल 2026 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत मायूषीबाबत माहिती शेअर केली. तिची उंची सुमारे 5 फूट 10 इंच असून, वजन: 150-160 पाउंड आहे. तिचे केस काळे, डोळे तपकिरी आहेत. या प्रकरणाचा तपास FBI , न्यू जर्सी शहर पोलीस आणि न्यू जर्सी राज्य पोलिसांकडून सुरू आहे. जुलै 2022 मध्ये मायूषी भगतला अधिकृतपणे मिसिंग पर्सन्स यादीत समाविष्ट करण्यात आले. सहा वर्षांनंतरही या प्रकरणाचा छडा लागलेला नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. FBI कडून जाहीर केलेल्या बक्षिसामुळे तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.