डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
By नरेश डोंगरे | Updated: April 14, 2026 22:05 IST2026-04-14T22:00:58+5:302026-04-14T22:05:42+5:30
पाच मिनिटात फत्ते मोहिम; आता साथीदारांवर मोठ्या कारवाईची शक्यता, अटक केलेली महिला तस्कर सध्या न्यायालयीन कोठडीत

डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
-नरेश डोंगरे, नागपूर
Nagpur Drugs Crime: अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या कारवाईत तब्बल सव्वा चार कोटींचे कोकेन पकडून महिला तस्कराला रविवारी गजाआड करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) युनिटने आता दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर केंद्रीत केली आहे. अटक केलेली महिला तस्कर न्यायालयीन कोठडीत आहे.
पाच ते दहा मिनिटांच्या तपासणीनंतर डीआरआयने कारवाईची मोहिम फत्ते केली. नागपूर स्थानकावर हजरत निजामुद्दीन केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकावर येताच डीआरआयची चमू ट्रेनमध्ये शिरली. महिला तस्कर नजरेस पडताच पंचासमक्ष तिच्या जवळच्या सामानाची तपासणी सुरू झाली. पाच मिनिटानंतर गाडी मार्गस्थ झाली आणि ती अजनी स्थानकावर पोहचण्यापूर्वीच या चमूने कामगिरी पूर्ण केली.
एवढे मोठे कोकेन शाम्पूच्या बाटलीतील द्रवात आणि कॅप्सूलच्या स्वरूपात लपवून घेऊन जाणाऱ्या या महिलेला अटक करण्यात आली. मात्र, तिने दिल्लीहून ज्यांच्याकडून ही महागडी खेप घेतली आणि ती पोहचविण्यासाठी ती दक्षिण भारतात ज्यांच्याकडे जात होती, त्यांची पाळेमुळे खोदण्याचे काम आता डीआरआयने सुरू केले आहे. यातून लवकरच मोठी अपडेट पुढे येण्याचा विश्वास संबंधित सूत्रांकडून वर्तविला जात आहे.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला पूरक अशा धडाकेबाज कारवाया करणाऱ्या डीआरआय नागपूर युनिटने वर्षभरात विविध रुपातील (प्रकारच्या) तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.
अनेक ठिकाणी कारवाया
डीआरआयच्या मुंबई झोनअंतर्गत नागपूर प्रादेशिक युनिट कार्यरत आहे. या युनिटने वर्षभरात ठिकठिकाणी जबरदस्त नेटवर्क तयार करून केवळ नागपूर, अमरावती विदर्भच नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडून अनेक तस्कर, माफिया, रॅकेटचा छडा लावला.
गेल्या वर्षी (२०२५) डिसेंबर मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशनाने राजकीय वातावरण गरम केले असताना डीआरआयने वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे छापा मारला. तेथील मेफेड्रोन (एमडी)चा कारखाना उध्वस्त करून तेथून तब्बल १२८ किलो एमडी जप्त केली.
५२२ किलो गांजा जप्त
कारंजा सारख्या छोट्याशा शहरात चक्क एमडीचा कारखाना सुरू असल्याची आणि तेथून एवढे मोठे घबाड जप्त करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ निर्माण झाली होती. याच युनिटने त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये भागेमारी टोल प्लाझा येथे सापळा रचून ५२२ किलो गांजा जप्त केला.
फेब्रुवारीत भिलाई येथे ७२९ किलो गांजा पकडला आणि अमरावती शहरात धडक देऊन तेथून ४.९ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. आता राजधानी एक्सप्रेसमध्ये १२ एप्रिलला सव्वा चार कोटींचे ८५३ ग्रॅम कोकेन जप्त. जबरदस्त नेटवर्कच्या बळावर करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवायांमुळे डीआरआयने माफियांसोबतच तपास यंत्रणांचेही लक्ष वेधले आहे.
वन्य प्राण्यांच्या तस्करीत गुंतलेलेही जेरबंद
ड्रग्ज माफियांविरुद्ध झिरो टॉलरन्सची मोहिम राबविताना दुसरीकडे या युनिटने वर्षभरापासून वन्यजीव तस्करीविरोधातही सातत्याने धडाकेबाज कारवाया करून अनेक मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे.
यात मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणारे रॅकेट, सिवनी येथे वाघाच्या पिल्लाची हत्या करून अवयव विक्रीचा प्रयत्न करणारी टोळी, भोपाळमधील बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणारांच्या मुसक्या आवळल्या.
त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील पिलेरू येथील पॅंगोलिन स्केल्स तस्करीचा आणि ११ एप्रिलला छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये धडक देऊन तेथूनही खवल्या मांजराच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या बांधल्या.
ओनली वर्क, नो नेम !
विविध प्रकारच्या माफियांवर, ड्रग्ज तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाया करणाऱ्या डीआरआयच्या युनिटचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे.
कितीही मोठी कारवाई केली तरी त्यासंबंधाने 'प्रेस नोट' देताना त्यात प्रसिद्धीसाठी आपली नावे देण्याचे डीआरआयचे अधिकारी टाळतात.
या संबंधाने संपर्क केला तरी 'ओनली वर्क, नो नेम' असे म्हणत ते प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक दूर राहतात.