"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:44 IST2026-04-14T18:55:44+5:302026-04-14T19:44:02+5:30
चिन्मयी नेहमीच तिचे विचार बिनधास्तपणे मांडताना दिसते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अगदी मुद्देसूद बोलताना दिसते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (१४ एप्रिल) १३५ वी जयंती संपूर्ण देशभरात आणि जगभरात भीमजयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, चिन्मयी सुमीतच्या जुन्या विधानाने पुन्हा एकदा सोशल मीडियाचे लक्ष वेधले आहे. 'तुम्ही जय भीमवाल्या आहात का?' असा प्रश्न करणाऱ्यांना चिन्मयी सुमीतनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

चिन्मयी सुमीत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाषणाची सुरुवात करताना 'नमस्कार' नंतर 'जय भीम' आवर्जून म्हणते. याच सवयीमुळे अनेकांनी तिला "तुम्ही जय भीमवाल्या आहात का?" असा प्रश्न विचारलाय.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १३ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात अभिनेत्रीनं तिच्या 'जय भीम' बोलण्यामागचा अर्थ सांगितला होता.

चिन्मयी म्हणालेली की, "मी जय भीम म्हणते... नेहमी नमस्कार केल्यानंतर, त्यामुळे मला खूप जण विचारतात की तुम्ही जय भीमवाल्या आहात का? तुम्ही त्यांच्यातल्या आहात का? तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, मी त्यांच्यातली आहे".

पुढे ती म्हणालेली, "मी आंबेडकरांची आहे. लोक वेगवेगळ्या जणांचे फॅन्स असतात तशी मी आंबेडकरांची फॅन आहे. मला वाटतं की भारतातील प्रत्येक भगिनीला 'जय भीम' म्हणावसं वाटलं पाहिजे".

चिन्मयी सुमीतनं यावेळी ती जय भीम का म्हणते, याबद्दल सांगितलं होतं. ती म्हणालेली, "आपल्याला माणूस म्हणून जो दर्जा आणि अधिकार मिळाले आहेत, ते आपल्या राज्यघटनेने दिले आहेत. या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांप्रती असलेली कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी, म्हणूनच मी 'जय भीम' म्हणते".

चिन्मयी सुमीतबद्दल बोलायचे झाल्यास ती मराठी व हिंदीतील दिग्गज अभिनेता सुमीत राघवनची पत्नी आहे. तिनं 'मुरांबा', 'पोरबाझार', 'हृदयनाथ' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेले. तसेच मराठी रंगमचांवरही ती सक्रीय असते.

चिन्मयी नेहमीच तिचे विचार बिनधास्तपणे मांडताना दिसते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर अगदी मुद्देसूद बोलताना दिसते.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा गौरव म्हणून त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक 'जय भीम' म्हणतात.

















