स्वयंपाकघरातील 'हे' ६ मसाले म्हणजे नॅचरल पेनकिलर! लहानमोठी दुखणी होतात घरच्याघरी बरी...
Updated:April 14, 2026 16:49 IST2026-04-14T16:41:11+5:302026-04-14T16:49:31+5:30
natural painkillers from kitchen : kitchen ingredients for pain management : best natural painkillers at home : स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक मसाले आहेत, जे उत्तम 'नॅचरल पेनकिलर' म्हणून काम करतात.

best natural painkillers at home
सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात वेदना होणे ही एक अतिशय कॉमन समस्या बनली आहे. मग ती डोकेदुखी असो, सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदना...जेव्हा या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे जातात, तेव्हा आपण लगेच 'पेनकिलर' घेतो. खरंतर, पेनकिलरचे मुख्य काम शरीरातील वेदनांचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचवण्यापासून रोखणे हे असते. जेव्हा शरीराला दुखापत किंवा सूज येते, तेव्हा आपल्या पेशी काही विशिष्ट रसायने सोडतात, जी नसांद्वारे मेंदूला वेदनेचा संदेश देतात. पेनकिलर ही रसायने तयार होण्याची प्रक्रियाच मंद करतात.
natural painkillers from kitchen
कधीतरी अगदीच आयत्यावेळी पेनकिलर घेणे ठीक आहे, परंतु वारंवार आणि अतिप्रमाणात पेनकिलरच्या गोळ्या घेतल्याने आपले लिव्हर आणि मूत्रपिंडासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. परंतु आपल्या पारंपरिक भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक मसाले आहेत, जे उत्तम 'नॅचरल पेनकिलर' म्हणून काम करतात. अशाच ६ खास मसाल्यांचे खास उपयोग पाहूयात, जे कोणत्याही दुष्परिणामाशिवाय वेदनांवर रामबाण उपाय ठरू शकतात.
१. हळद :-
भाजी - डाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या हळदीमध्ये 'अँटी-इन्फ्लेमेटरी' (सूज कमी करणारे) गुणधर्म असतात, जे सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. तसेच, डोकेदुखीवर मात करण्यासाठी देखील हळद अत्यंत गुणकारी आहे. हळदीतील 'कर्करुमीन' (Curcumin) हे घटक सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतात. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे, ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. रात्री झोपताना कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून घेतल्यास शरीरातील वेदना कमी होतात.
२. आलं :-
आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचे दाहशामक घटक असतात. स्नायूंच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी आलं सर्वोत्तम आहे. हे मायग्रेन आणि मळमळण्याच्या समस्येपासूनही आराम मिळवून देते. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी आल्याचा चहा किंवा अर्क खूप फायदेशीर ठरतो.
३. लवंग :-
दातदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी लवंग अत्यंत गुणकारी आहे. याला 'नॅचरल एनेस्थीसिया' असेही म्हटले जाते, जे सूज (Inflammation) कमी करण्याचे काम करते. दात दुखत असल्यास तिथे लवंग किंवा लवंगेचे तेल लावल्यास वेदना लगेच थांबतात. लवंगामध्ये 'युजेनॉल' नावाचे तेल असते, जे नैसर्गिक भूल देण्याचे काम करते. म्हणूनच दात दुखत असल्यास त्या जागी लवंग धरल्यास ती जागा बधीर होते आणि वेदना थांबतात. जर हिरड्यांना सूज आली असेल किंवा तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर लवंग घातलेल्या पाण्याने गुळण्या करणे उत्तम उपाय आहे. लवंग केवळ वेदनाच कमी करत नाही, तर तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासही मदत करते.
४. दालचिनी :-
सांधेदुखीवर मात करण्यासोबतच दालचिनी रक्ताभिसरण सुधारण्याचे आणि मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे काम करते. दालचिनीमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सांधेदुखी असलेल्या लोकांसाठी दालचिनी खूप लाभदायक आहे, कारण यामुळे सांध्यांमधील सूज आणि जडपणा कमी होतो. शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे स्नायूंच्या वेदना आपोआप कमी होतात. अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास शरीरातील जुन्या वेदनांपासून आराम मिळतो.
५. काळीमिरी :-
काळीमिरी सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शरीरातील अशा रसायनांचे प्रमाण कमी करण्यास ती मदत करते, ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज आणि वेदना निर्माण होतात. जर तुम्हाला सर्दी-खोकल्यामुळे अंगदुखी होत असेल, तर चहामध्ये किंवा काढ्यामध्ये काळीमिरी वापरल्याने खूप आराम मिळतो. यात असणारे 'पिपेरिन' हे घटक वेदनाशामक म्हणून काम करतात.
६. लसूण :-
'अँटी-इन्फ्लेमेटरी' गुणधर्मांमुळे लसणाला आयुर्वेदामध्ये एक शक्तिशाली नैसर्गिक पेनकिलर मानले गेले आहे. हे शरीरातील विविध वेदनांपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. लसणाच्या २ ते ३ पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने किंवा लसणाचे तेल सांध्यांवर लावल्याने जुनी सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. हे रक्तातील गाठी होण्यापासूनही रोखते.