अरे बसा ना अभ्यासाला, आईबाबांनी असं ओरडून उपयोग नाही! शांतपणे करा ७ गोष्टी-बघा अभ्यासातली प्रगती
Updated:April 14, 2026 15:31 IST2026-04-14T15:23:22+5:302026-04-14T15:31:06+5:30
Positive parenting for academic success: Student mental health and career guidance: पालकांनी त्यांना ओरडण्याऐवजी ७ महत्त्वाच्या गोष्टी सांगायला हव्या. पाहूया मुलांशी बोलताना नेमकं काय बोलायला हवं.

मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंगच्या जगात मुलांना अभ्यास नकोसा वाटतो. तासनतास मोबाईलवर रिल्स पाहात बसणं किंवा गेम खेळत बसणं जणू त्यांच्या रोजच्या सवयीचे झाले आहे. यामुळे त्याचे अभ्यासावरुन लक्ष विचलित होते. पालकांना वाटते की मुलांवर ओरडल्यावर किंवा त्यांना धाकात ठेवल्यावर ते अभ्यासाला बसतील. पण वास्तवात यामुळे मुलं मानसिकरित्या लांब जाण्याची शक्यता अधिक असते. मुलांना कायम धाकात ठेवण्यापेक्षा त्यांच्यासोबत संवाद साधून व्हिजन स्पष्ट करुन देणे अधिक महत्त्वाचे ठरते. (Positive parenting for academic success)
करिअर म्हणजे फक्त मार्क्स मिळवणे नसून ते स्वत:च्या पायावर उभं राहून सन्मानाने जगण्याचे साधन आहे. हे त्यांना प्रेमाने पटवून द्या. आपले मूलही अभ्यासाला टाळाटाळ करत असेल तर पालकांनी त्यांना ओरडण्याऐवजी ७ महत्त्वाच्या गोष्टी सांगायला हव्या. पाहूया मुलांशी बोलताना नेमकं काय बोलायला हवं. (Student mental health and career guidance)
मुलांना विचारा की त्यांना नक्की काय करायला आवडते. जेव्हा मुलं स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडतात, तेव्हा त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत नाही. करिअर हे फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअरपुरता मर्यादित नसते.
गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, ही गोष्ट मुलांना उदाहरणासह पटवून द्या. अभ्यासाची वेळ आणि खेळाची वेळ याचे नियोजन कसं करावे हे त्यांना शिकवा.
यशस्वी व्यक्तीच्या गोष्टी मुलांना सांगा. यश हे एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्य आणि मेहनत दोन्ही लागते. हे त्यांना समजेल अशा भाषेत सांगा. कष्टाशिवाय पर्याय नसतो.
अनेकदा अभ्यासाच्या ओझ्यामुळे किंवा नापास होण्याच्या भीतीमुळे मुलं टाळाटाळ करतात. त्यांना समजावून सांगा अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यासाठी प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं असतं.
मुलांना सांगा सोशल मीडियावर दिसणारं जग आणि वास्तव यात बराच फरक असतो. रिल्स किंवा गेम्समध्ये वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करणं महत्त्वाचं आहे.
मुलांना घरातल्या छोट्या-मोठ्या कामात सहभागी करुन घ्या. जेव्हा मुलांना जबाबदारीची सवय होते, तेव्हा ते स्वत:च्या करिअरबद्दलही जबाबदार बनू लागतात.
मुलांना मोठी स्वप्न पाहायला सांगा आणि ती पूर्ण करण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे देखील समजवा. शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून ज्ञानासाठी आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवा.