"माझी बायको वेगळ्या कास्टची आहे, त्यामुळे..."; घरात गणपती बसवल्याने झालेल्या वादावर भाऊ कदम काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 17:38 IST2026-04-14T17:19:42+5:302026-04-14T17:38:28+5:30
२०१७ मध्ये भाऊ कदम यांना एका मोठ्या वादाला तोंड द्यावं लागलं. घरी गणपती बसवल्याने भाऊ कदम यांना बौद्ध समाजाची तीव्र नाराजी पत्करावी लागली. अखेर भाऊंनी याविषयी मौन सोडलंय

भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. भाऊ कदम यांनी गेली अनेक वर्ष नाटक, मालिका, सिनेमे आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. भाऊ कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील वादग्रस्त घटनेचा उल्लेख केलाय.

२०१७ मध्ये भाऊ कदम यांना एका मोठ्या वादाला तोंड द्यावं लागलं. घरी गणपती बसवल्याने भाऊ कदम यांना बौद्ध समाजाची तीव्र नाराजी पत्करावी लागली. अखेर इतक्या वर्षांनंतर भाऊ कदम यांनी याविषयी खुलासा केला.

सागर खापरेला दिलेल्या पॉडकास्टमध्ये भाऊ कदम म्हणाले की, ''माझी बायको वेगळ्या कास्टची. मी वेगळ्या कास्टचा. तिच्या घरी गणपती यायचा. तर मला कोणीतरी शाडूचा गणपती गिफ्ट दिला होता. इको फ्रेंडली होता.''

भाऊ कदम पुढे म्हणाले, ''तर तो शाडूचा गणपती मी घरी घेऊन आलो. बायकोने बघितलं ती म्हणाली आपण तो ठेवूया. पुढे एक वृत्तवाहिनी घरी शूट करायला आली. शूट झाल्यामुळे ते दिसलं आणि मग आमचे जे बौद्ध बांधव ते म्हणाले, हे बरोबर नाही. आम्ही हे करत नाही तर तुम्ही हे करायचं का.''

''सॉरी, मला नव्हतं माहिती की याचे एवढे पडसाद उमटतील. आणि मग मी काही कोणाला रिप्लाय नाही दिला. म्हटलं, जाऊ दे, नको! जो मला बघून मोठा होतोय, आणि आपण जर त्याचा आदर्श ठरतोय आणि हे त्यांनाही नको असेल तर त्यांचंपण बरोबर आहे. तुम्हाला वाईट वाटतंय तर नको. मग मी आता परत नाही ते केलं.'', असा खुलासा भाऊ कदम यांनी केला.

अशाप्रकारे भाऊ कदम यांनी या मुलाखतीत खुलासा केला. एकूणच बायकोची इच्छा होती आणि अजाणतेपणाने ही गोष्ट घडली हे त्यांनी सांगितलं. याशिवाय अरे ला कारे न करता चाहत्यांच्या इच्छेचा त्यांनी मानही ठेवला.

भाऊ कदम सध्या नाटकात काम करत आहेत. याशिवाय काही मराठी सिनेमांमध्येही ते कॉमेडी भूमिका करुन प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहेत.

















