Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:43 IST2026-04-14T14:41:22+5:302026-04-14T14:43:04+5:30
Vastu Shastra: रांगोळी आवडते पण काढता येत नाही किंवा वेळ मिळत नाही अशी सबब आपण देतो, पण रांगोळीचे महत्त्व लक्षात घेतले तर आपणही नक्कीच वेळ काढू.

Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
भारतीय संस्कृतीमध्ये कला आणि परंपरांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यातही घराच्या अंगणात रेखाटलेली रांगोळी ही केवळ रेघ किंवा रंगांची रचना नसून ती समृद्धी, मंगलमयता आणि कलेचा आविष्कार आहे. रोज दाराबाहेर रांगोळी काढण्याचे असंख्य लाभ आहेत.
हे ही वाचा : Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
भारतीय परंपरेत रांगोळीला केवळ सजावटीचे साधन न मानता, तिला एक पवित्र आणि शास्त्रशुद्ध कला मानले जाते. या कलेचा प्रवास प्राचीन ग्रंथांपासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत अत्यंत विलोभनीय राहिला आहे.
१. कामसूत्रातील 'कला' म्हणून उल्लेख
प्राचीन काळी मानल्या गेलेल्या चौसष्ट कलांमध्ये रांगोळीचा अंतर्भाव होतो. वात्सायनाच्या 'कामसूत्र' या ग्रंथात रांगोळीचा उल्लेख आढळतो. त्यात रांगोळीची व्याख्या 'मन प्रसन्न करणारी कला' अशी केली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एकाग्रतेने रांगोळी रेखाटते, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा केवळ पाहणाऱ्यालाच नाही, तर काढणाऱ्यालाही मानसिक शांती देतो.
२. धार्मिक अनुबंध आणि उगम
रांगोळीचा उगम हा मूलतः धार्मिक विधी आणि रचनेतून झाला आहे. हिंदू, जैन आणि पारशी धर्मात रांगोळीला अत्यंत शुभप्रद मानले जाते. असे मानले जाते की,
घरासमोर काढलेली रांगोळी ही घराचे अशुभापासून आणि दूषित शक्तींपासून रक्षण करते. ती एक प्रकारची 'संरक्षक कवच' म्हणून काम करते, ज्यामुळे नकारात्मकता घराबाहेरच थांबते.
हे ही वाचा : स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
३. रांगोळीचे विलोभनीय आणि वैविध्यपूर्ण स्वरूप
रांगोळी म्हणजे केवळ पांढरी पिठी नव्हे, तर सृजनशीलतेचा तो एक मोठा कॅनव्हास आहे. काळानुसार त्याचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत:
धान्यांची रांगोळी: समृद्धीचे प्रतीक म्हणून विविध धान्यांचा वापर करून रेखाटलेली रांगोळी.
फुलांची रांगोळी: सुवासिक आणि ताजी फुले वापरून सणासुदीला काढली जाणारी रांगोळी.
पाण्यावरील रांगोळी: विज्ञानाचा आणि कलेचा सुरेख संगम म्हणजे पाण्यावर तरंगणारी नेत्रसुखद रांगोळी.
फळांची रांगोळी: नैवेद्याच्या ठिकाणी किंवा विशेष पूजेसाठी फळांची रचना करून केलेली कलाकृती.
४. कौतुकाचा विषय आणि संस्कार
रांगोळी ही पूर्वापार चालत आलेली आपली कलासंस्कृती आहे. ती केवळ जमिनीवरची रेषा नसून संस्कारांचे लेणे आहे. एका जुन्या काव्यपंक्तीत रांगोळीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे:
"फुले स्वस्तिके रांगुलीची लिहावी,
अशी की, जने कौतुके ती पहावी!"
अर्थात, आपल्या अंगणात फुले आणि स्वस्तिकाच्या रांगोळीची रेखण अशी असावी की, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने थांबून कौतुकाने ती पाहावी आणि त्यातून त्या घराची सुबत्ता आणि रसिकता जगासमोर यावी.