१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 14:14 IST2026-04-14T14:12:55+5:302026-04-14T14:14:37+5:30
पत्नीच्या सातत्याने वाढत्या मागण्यांना त्रस्त होऊन पतीच्या वकिलांनी प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या नाटकातील द मर्चंट ऑफ वेनिसमधील क्रूर चरित्रांतील शाइलॉकचं उदारहरण दिले

१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात अलीकडेच एका घटस्फोट आणि वैवाहिक वादाच्या सुनावणीत शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. या प्रकरणात पती-पत्नी अवघ्या ७ महिन्यांसाठी एकत्र राहिले होते. मात्र या जोडप्यांमधील वाद कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या पतीच्या कुटुंबासाठी महागात पडला.
सुनावणीवेळी पतीच्या वकिलांनी कोर्टासमोर त्यांची बाजू मांडताना म्हटलं की, लग्नानंतर हे जोडपे केवळ ७ महिने एकत्र राहिले होते. पतीने साम्यंजस्याने आधीच पत्नीला १.६५ कोटी इतकी रक्कम देऊन बसला आहे. इतके पैसे मिळून अजूनही पत्नीला पतीकडून काय हवंय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा खटला लवकरात लवकर संपवावा अशी विनंती वकिलांनी कोर्टाकडे केली. या वादामुळे संपूर्ण कुटुंबाला किंमत मोजावी लागत आहे. पत्नीने पतीच्या कुटुंबाविरोधात वेगवेगळे २१ गुन्हे दाखल केलेत. ज्यातून पतीची बहीण आणि वडील दोघांनाही जेलची हवा खावी लागली.
पत्नीच्या सातत्याने वाढत्या मागण्यांना त्रस्त होऊन पतीच्या वकिलांनी प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या नाटकातील द मर्चंट ऑफ वेनिसमधील क्रूर चरित्रांतील शाइलॉकचं उदारहरण दिले. ती शाइलॉकसारखी वागणूक करते, ज्यात ती कर्जाच्या बदल्यात शरीरातून एक पाउंड मांस मागते. पतीची आर्थिक परिस्थिती आता संपली आहे. त्यामुळे तो आता अधिक पैसे देऊ शकत नाही असं पतीच्या वकिलांनी कोर्टासमोर विनवणी केली. दुसरीकडे पत्नीच्या वकिलांनी कोर्टासमोर हा प्रकार केवळ नुकसान भरपाईचा नाही. पत्नीचे १ किलो सोने सासरच्यांकडे आहे. जे त्यांनी गहाण ठेवले आहे. दोन्ही पक्षात मागील काळात साम्यजंस्य करार झाला होता. त्यात पत्नीला रोकडच नव्हे तर १ किलो सोनेही परत केले जाणार होते असं त्यांनी कोर्टाला सांगितले.
सुप्रीम कोर्टाने दिला अंतिम निकाल
दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने या खटल्यात अंतिम निकाल सुनावला. सुरुवातीला कोर्टाने पतीला पत्नीचे १ किलो सोने परत देण्याचे निर्देश दिले. मात्र पतीने आता तो अधिक खर्च उचलण्याच्या स्थितीत नाही असं सांगितले असता कोर्टाने १ किलो सोन्याच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सोन्याची किंमत १.२५ कोटी रुपये पत्नीला देण्यास सांगितले. त्याशिवाय एक अट घातली जेव्हा पती ही पूर्ण रक्कम पत्नीला भरपाई म्हणून देईल तेव्हा कायदेशीररित्या या दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी मिळेल असं कोर्टाने सांगितले.