"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:36 IST2026-04-14T16:35:09+5:302026-04-14T16:36:05+5:30
Nitish Kumar resignation: नितीश कुमार यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
Nitish Kumar Latest News Marathi: बिहार सरकारमधील नितीश कुमारांचे काम आज थांबले. गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. १४ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा सोपवला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता थांबतोय, नव्या सरकार माझा भक्कम पाठिंबा राहील, अशा भावना नितीश कुमार यांनी व्यक्त केल्या.
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सोपवल्यानंतर एक्सवर पोस्ट लिहून त्यांची भूमिका मांडली.
नितीश कुमार म्हणाले, सर्वच समाज घटकांचा विकास केला
एक्सवरील पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, "तुम्हाला माहिती आहे की, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्यांदा राज्यात एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हापासून कायद्याचे राज्य आणि आम्ही विकास कामे करत आहोत. सरकारने सुरुवातीपासूनच सर्व समाज घटकांचा विकास केला, मग तो हिंदू असो, मुस्लीम असो, उच्च वर्णीय असो किंवा मागास घटकातील असो, अति मागास प्रवर्गातील असो, सर्वांसाठीच काम केले. प्रत्येक क्षेत्रात काम झाले आहे, मग ते शिक्षण असो, आरोग्य असो, रस्ते निर्माण, वीज पुरवठा, कृषी असो. महिला आणि तरुण वर्गासाठीही खूप काम केलं गेलं आहे."
"बिहार देशाच्या विकासात योगदान देईल"
नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, "गेल्या काही काळापासून कामाचा वेग वाढवला आहे. पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजे २०२५ ते २०३० या काळासाठी ७ निर्धार करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण होईल आणि त्यामुळे बिहार आणखी पुढे जाईल."
"बिहारच्या विकासामध्ये केंद्र सरकारचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. बिहार आणखी वेगाने विकसित होत जाईल आणि देशातील वरच्या राज्याच्या यादीत सामील होईल. त्याचबरोबर देशाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान देईल", असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
ठरवलं की राजीनामा द्यायचा
नितीश कुमार यांनी पुढे म्हटले आहे की, "आम्ही बिहारच्या लोकांसाठी खूप सारं काम केलं आहे. इतक्या दिवसांपासून आणि निरंतर लोकांची सेवा करत आलो आहोत. मी ठरवलं होतं की, आता मुख्यमंत्री पद सोडून द्यायचे आणि आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यपालाची भेट घेऊन त्यांना माजा राजीनामा सोपवला. आता नवे सरकार इथले काम बघेल. नव्या सरकारला माझा पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील. यापुढे खूप चांगले काम होत राहील आणि बिहार खूप पुढे जाईल", अशा भावना नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केल्या.