कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:46 IST2026-04-14T15:45:42+5:302026-04-14T15:46:02+5:30
Kharegaon Tollnaka Accident: खारेगाव टोलनाक्याजवळ अपघात; आयटी पार्कचे कर्मचारी घरी परतताना घडली घटना

कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी
जितेंद्र कालेकर
Thane Accident: वागळे इस्टेट येथील 'आशर आयटी पार्क'मध्ये काम संपवून डोंबिवलीकडे आपल्या घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खासगी मोटारकारला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने खारेगाव टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या मालवाहू ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कार चालक दीपक पटेकर (वय २६, रा. अंबिका नगर, ठाणे) याचा जागीच मृत्यू झाला असून सुजय पाटील (२०) याच्यासह चौघे सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींपैकी एका तरुणीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर उर्वरित तीन कर्मचाऱ्यांना ठाणे आणि नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्याजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी पहाटे ३.३० ते ३.५५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वागळे इस्टेट येथून ही कार डोंबिवलीच्या दिशेने जात होती. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या 'शिवशंकर ट्रान्सपोर्ट'च्या ट्रेलरला कारने पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये चालक दीपक आतमध्ये अडकला होता.
बचावकार्य आणि रुग्णालयात धाव
घटनेची माहिती मिळताच कळवा पाेलिसांसह वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी क्रेन आणि रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागून गंभीर जखमी झालेल्या दीपकला मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेले सर्व प्रवासी हे डोंबिवली पूर्व येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी सुजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला घणसोलीतील रुग्णालयात दाखल केले.
राज चिले (२१) आणि सुगम जयस्वाल (२४) या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्या स्नेहल भूसेकर (२३) या तरुणीवर कळवा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरू होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला. कळवा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.