चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:15 IST2026-04-14T16:14:10+5:302026-04-14T16:15:38+5:30

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या दाव्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.

China's trunk will not go away! The dragon is again moving over Arunachal's names; India has delivered strong words! | चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!

चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!

आपल्या विस्तारवादी धोरणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची बनावट नावे जाहीर करण्याच्या चीनच्या कृतीचा भारताने तीव्र निषेध केल्यानंतर, चीनने मंगळवारी पुन्हा एकदा अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. "अरुणाचल प्रदेशावर आमचाच अधिकार असून, आम्ही तिथे नावे बदलू शकतो," असा मुजोर दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. याला भारताने चोख प्रत्युत्तर देत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील, असे ठणकावून सांगितले आहे.

ड्रॅगनच्या कुरापतींचा पाढा

चीनने नुकतीच अरुणाचल प्रदेशातील २३ ठिकाणांची नावे बदलून एक नवीन यादी जाहीर केली. गेल्या १० वर्षांतील चीनचा हा सहावा असा प्रयत्न आहे. चीन अरुणाचल प्रदेशाला 'जांगनान' म्हणतो आणि त्यावर आपला हक्क सांगतो. यापूर्वी २०१७, २०२१ आणि २०२३ मध्येही चीनने अशाच प्रकारे ठिकाणांची नावे बदलण्याचा खोडसाळपणा केला होता.

भारताने दाखवला वास्तविकतेचा आरसा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. "भारतीय भूभागातील ठिकाणांना काल्पनिक किंवा स्वेच्छेने नावे दिल्याने जमिनीवरील सत्य बदलत नाही. चीनचे असे प्रयत्न केवळ खोडसाळपणा आहेत," असे जयस्वाल यांनी म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या कृतींमुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो.

संबंधांमध्ये नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न

२०२० मधील पूर्व लडाख सीमेवरील वादानंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला होता. गेल्या दीड वर्षात दोन्ही बाजूंकडून संबंध सुधारण्यासाठी काही पावले उचलली जात असतानाच, चीनने पुन्हा एकदा अरुणाचलचा मुद्दा उपस्थित करून नकारात्मकता निर्माण केल्याचे भारताने म्हटले आहे. "चीनने अशा कृतींपासून दूर राहावे, ज्यामुळे परस्पर सामंजस्य बिघडते आणि संबंधांवर वाईट परिणाम होतो," असा सल्लाही भारताने दिला आहे. 

एकूणच, चीनच्या या नामकरणाच्या राजकारणामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे सावट निर्माण होण्याची शक्यता असून, भारत आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या सार्वभौमत्वासाठी खंबीर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title : चीन की हरकतें जारी; भारत ने अरुणाचल के नामों पर फटकारा।

Web Summary : चीन के अरुणाचल प्रदेश पर दावे और नाम बदलने के प्रयासों की भारत ने कड़ी निंदा की, और कहा कि अरुणाचल भारत का अभिन्न अंग है। ऐसी हरकतें संबंधों को सुधारने में बाधक हैं।

Web Title : China's antics continue; India rebukes renaming of Arunachal places.

Web Summary : China's claim over Arunachal Pradesh and renaming attempts were strongly condemned by India, asserting Arunachal is an integral part of India. Such actions hinder improving relations.