आजच्या काळात चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI चा दबदबा आहे. रोख रक्कम सोबत ठेवण्याची कटकट संपली असून, फक्त मोबाईल काढून स्कॅन केलं की पेमेंट पूर्ण होतं. मात्र, या वाढत्या डिजिटल व्यवहारामुळे अनेकदा लोकांच्या मनात भीती असते की, जास्त ट्रान्झॅक्शन केल्यामुळे आपला सिबिल स्कोर (CIBIL Score) कमी तर होणार नाही ना? जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, UPI आणि सिबिल स्कोरमधील संबंध तुम्ही समजता तसा नाही.
UPI ट्रान्झॅक्शनमुळे सिबिल स्कोर घसरतो का?
सर्वात आधी हे समजून घ्या की, UPI पेमेंटचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर कोणताही थेट परिणाम होत नाही. तुम्ही दिवसातून ५ वेळा पेमेंट करा किंवा ५० वेळा, यामुळे तुमचा स्कोर ना वाढणार आहे, ना कमी होणार. सिबिल स्कोर प्रामुख्याने तुमच्या कर्जाचे हप्ते (EMI) आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या इतिहासावर अवलंबून असतो. UPI द्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा असलेल्या स्वतःच्या पैशांचा वापर करता, त्यामुळे हे व्यवहार क्रेडिट रेटिंगच्या कक्षेत येत नाहीत.
बँक स्टेटमेंट आणि लेंडर्सची नजर
तुमचा स्कोर पडत नसला तरी, जेव्हा तुम्ही भविष्यात वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज करता, तेव्हा बँका तुमचे बँक स्टेटमेंट बारकाईनं तपासतात. जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये दर दोन मिनिटांनी १०-२० रुपयांचे शेकडो छोटे-छोटे व्यवहार दिसत असतील, तर स्टेटमेंट खूप लांब आणि क्लिष्ट होत. कर्ज देणाऱ्या संस्था तुमच्या खर्चाच्या सवयींकडे लक्ष देतात. जर खाते वारंवार 'झिरो बॅलन्स'च्या जवळ पोहोचत असेल, तर ते तुमचे कमकुवत आर्थिक नियोजन दर्शवते, ज्यामुळे कर्ज मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात.
कर्ज घेताना शिस्त महत्त्वाची
एक चांगली क्रेडिट प्रोफाइल राखण्यासाठी सिबिल स्कोरसोबतच आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च याचे प्रमाण किती आहे, हे बँका पाहतात. जर UPI चा अंदाधुंद वापर तुमच्या बजेटवर परिणाम करत असेल, तर बँका तुम्हाला जोखीम असलेला ग्राहक मानू शकतात. त्यामुळे डिजिटल पेमेंट जरूर करा, पण आपल्या बँक बॅलन्स आणि खर्चामध्ये संतुलन राखा, जेणेकरून कर्ज घेताना तुमची प्रतिमा एका जबाबदार गुंतवणूकदाराची राहील.
