आता २०२७ मध्येच लग्न करावे लागणार ! असे आहेत आठ महिन्यांतील प्रमुख अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 19:43 IST2026-05-09T19:32:55+5:302026-05-09T19:43:14+5:30

लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न निश्चित ठरविले जाते. लग्नाचा सिझन जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे. १७ मे पासून पुढील आठ महिने तरी शुभमुहूर्ताच्या तारखा नाहीत. शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहेत, त्यांनी आता १७ मेपूर्वीच सोहळा उरकण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. वाढत्या तापमानाचाही लग्न समारंभांना फटका बसत आहे. सायंकाळचा मुहूर्त शोधण्यावर भर दिला जात आहे. १७ मे पूर्वी लग्न उरकता यावे, म्हणून मंगल कार्यालयातील ठराविक तारखा हाऊसफुल्ल आहेत. या तारखांच्या विवाहाला मंगलकार्यालय मिळत नसल्याने गावपातळीवर लग्न करण्यावरही अनेकांकडून भर दिला जात आहे. यातून धावपळ वाढली आहे.

१७ मे ते १५ जून २०२६ या काळात अधिक मास' येत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर लगेच जुलैपासून गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून, चातुर्मासाची सुरुवात होईल. या काळात मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. तसेच ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तावर होणार आहे. यामुळे विवाहासाठी मुहूर्ताचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांची लगबग सुरू आहे. आता जेमतेम १४ दिवस मुहूर्त शिल्लक असल्याने धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

असे आहेत आठ महिन्यांतील प्रमुख अडथळे : १७ मे ते १५ जून: अधिक मास असल्याने शुभकार्ये बंद, जुलैपासून गुरू-शुक्राचा अस्त आणि चातुर्मास प्रारंभ, ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे मुहूर्ताची अडचण, पुढील मुहूर्त थेट जानेवारी २०२७ मध्ये.

पुढील १३ दिवसांत शुभमुहूर्त पाहून लग्न उरकावे लागणार आहे. नाहीतर आठ महिने थांबावे लागणार आहे. आता नाही तर थेट पुढल्या वर्षी विवाह करावा लागणार असल्याने तारांबळ उडाली आहे.

एकाच दिवशी अनेक लग्न, नातेवाइकांचा फज्जा : मुहूर्ताच्या या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालये, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आला आहे. एकाच दिवशी अनेक लग्नसोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण् येत आहे. ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, ऐनवेळी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. एकाच दिवशी अनेक लग्न असल्याने नातेवाइकांपुढेही पेच निर्माण होणार आहे.

अनेक लग्नसोहळे असल्याने सेवा पुरवदारांवर ताण : मुहूर्ताच्या या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालये, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आला आहे. एकाच दिवशी अनेक लग्न सोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण् येत आहे. ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणे कठीण झाले असून, ऐनवेळी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.