HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:02 IST2026-05-14T16:33:09+5:302026-05-14T17:02:01+5:30
HSRP Number Plate News: HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे. वाढीव मुदतीत HSRP लावली नाही तर मात्र कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे म्हटले जात आहे. किती दंड आकारला जाणार?

HSRP Number Plate Updates: राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलैपासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे.

यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी. केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. HSRP नंबर प्लेट्स सहजासहजी बदलता येत नाहीत, यामुळे वाहन चोरीच्या घटना कमी होतील.

HSRP हाय सिक्युरिटी प्लेटमुळे बनावट नंबर वापरणे अशक्य होईल. गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर टाळण्यासाठी आणि वाहनांची ओळख पारदर्शक करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे.

ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क आकारण्यात येईल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

परिवहन मंत्र्यांनी सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी मुदतवाढीचा लाभ घेत घाई न करता अधिकृत प्रक्रियेचा अवलंब करावा. परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. HSRP बसवण्यासाठी आपली आगाऊ वेळ निश्चित करा.कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नका.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील २०१९च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. परंतु वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती.

ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची संख्या कमी आहेत. काही फिटमेंट केंद्रचालकांकडून केंद्र बंद करण्यात आले आहे. अद्यापही लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट लावली नसल्याचे म्हटले जात आहे.

















