Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:57 IST2026-05-14T16:57:00+5:302026-05-14T16:57:53+5:30
एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.

Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
आसामच्या चराइदेव जिल्ह्यातील मथुरापूर बागीचा प्राथमिक शाळेतून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. वर्गात बसवण्यात आलेल्या CCTV फुटेजमुळे या घटनेचा खुलासा झाला असून त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाची नाव मोहम्मद आरिफुल इस्लाम असं आहे. तो मथुरापूर तिनियाली परिसरातील रहिवासी आहे. मोहम्मद आरिफुल इस्लाम हा शाळेतील लहान मुलांशी तो अयोग्य वर्तन करायचा आणि वर्गामध्ये त्यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करायचा.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्गातील CCTV कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग तपासलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. फुटेजमध्ये हा शिक्षक अनेक विद्यार्थ्यांशी हिंसक वागताना स्पष्टपणे दिसत आहे. हे दृश्य पाहून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला, त्यानंतर या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
असम के चराइदेव ज़िले के मथुरापुर टी एस्टेट प्राइमरी स्कूल में शिक्षक की हैवानियत CCTV में कैद।#Assam#Charaideo#SchoolViolence#ViralVideopic.twitter.com/Rw96Ts3Yck
— Maharashtra Bandhu News (@BandhuNews_in) May 14, 2026
मुलीला मारलं, मुलाला उलटं टांगलं
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा शिक्षक लहान मुलींना काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, एका विद्यार्थ्याला पकडून त्याने उलटे टांगलं आणि त्याला खिडकीबाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा त्याला उलटं लटकवून मारहाण केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. "शाळा ही मुलांसाठी सुरक्षित जागा असायला हवी, मात्र अशा घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे" अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर बनलं. पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आसाम टी ट्राइब्स स्टुडंट्स असोसिएशनने (ATTSA) जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आरोपीवर कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा व्यवस्थापनानेही शिक्षण विभागाकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे.