सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:31 IST2026-05-14T17:30:06+5:302026-05-14T17:31:18+5:30
NCP Sunetra Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
NCP Sunetra Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या पदाधिकार्यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना वगळल्याचे समोर आले असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी अचानक राजीनामा दिला आहे. या तडकाफडकी राजीनाम्यामुळे पक्षातील घडामोडींना वेग आला असून, हा सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!, असे आनंद परांजपे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक पत्र दिले आहे.
राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती
आनंद परांजपे यांनी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक - ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदा-या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे. तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती. धन्यवाद!, असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधान परिषदेत जाण्याची संधी न मिळाल्यामुळे आनंद परांजपे हे गेले अनेक दिवस नाराज होते असे म्हटले जात आहे. त्यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंद परांजपे यांनी अलीकडेच भेट घेतली होती. त्यामुळे आनंद परांजपे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!… pic.twitter.com/b23ltOnSCM
— Anand Paranjpe (@paranjpe_anand) May 14, 2026