Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:23 IST2026-05-14T12:22:12+5:302026-05-14T12:23:12+5:30
Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांचा विशेष तपास पथकानेतपास पूर्ण करत ६० दिवसांत पहिले दोषारोपपत्र साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दाखल केले.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
नाशिक : भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांचा विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास पूर्ण करत ६० दिवसांत पहिले दोषारोपपत्र साक्षी पुराव्यांवरून बुधवारी (दि. १३) न्यायालयात दाखल केले. खरात हा मागील ४९ दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. खरातविरूद्ध नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एसआयटीकडून नऊ गुन्ह्यांचा तपास केला जात आहे.
१७ मार्च रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदू अशोक खरात याच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आणि शहर पोलिसांनी त्यास रात्रीतून सिनेस्टाइल बेड्या ठोकल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळसुद्धा यामुळे ढवळून निघाले होते. यानंतर आठवडाभरात खरातविरुद्ध आणखी सात गुन्हे दाखल झाले होते.
भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
फसवणुकीसह अंधश्रद्धा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत तसेच सावकारी अधिनियमांतर्गत असे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचाराच्या सर्व गुन्ह्यांसह फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे. तीन गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलिस व आणखी तीन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत.
भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
"माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
१०५पेक्षा अधिक साक्षीदारांकडे चौकशी
महिला लैंगिक अत्याचाराच्या आठ गुन्ह्यांसह फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीने आतापर्यंत १०५पेक्षा अधिक साक्षीदारांकडे चौकशी केली आहे. या चौकशीतून व पीडितांकडे केलेल्या विचारपूसमधून आरोपी भोंदू खरात हा पीडित व्यक्ती व कुटुंबांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांना भीती दाखवून विविध रत्न देत पुजाविधीच्या नावाखाली फसवणूक व अत्याचार करत होता, असे समोर आले आहे. तसेच पीडितांना बदनामीची धमकी देऊन भोंदू खरात हा लैंगिक शोषण करत होता, असे स्पष्ट झाले आहे. यानुसार कागदपत्रांसह परिस्थितीजन्य पुराव्यांसह इलेक्ट्रॉनिक पुरावे संकलन करून दोषारोपपत्र दाखल केले आहे.