NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:31 IST2026-05-14T12:31:16+5:302026-05-14T12:31:33+5:30
नीट पेपर लीक प्रकरणात राजस्थान आणि नाशिक कनेक्शन उघड झाले आहे. २ ते ५ लाख रुपयांना पेपर विकला गेल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली आहे.

NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-युजी पेपर लीक प्रकरणाने आता संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाच्या तपासात दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. राजस्थानमध्ये पेपर कसा पोहोचला आणि त्याचे नाशिक कनेक्शन काय आहे, याचा शोध घेताना आता यश यादव आणि विकास बिवाल ही नावे समोर आली आहेत. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा खरा सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे.
राजस्थानमध्ये असा पोहोचला पेपर!
तपास यंत्रणांच्या मते, पेपर लीकचा प्रवास हा बिहार आणि उत्तर प्रदेशातून सुरू होऊन राजस्थानपर्यंत पोहोचला. या प्रकरणाचा तपास करत असताना असे समोर आले आहे की, पेपर यश यादव याच्यामार्फत राजस्थानमध्ये पोहोचला. यशची ओळख विकास बिवाल नावाच्या व्यक्तीशी होती. विकास बिवालचे वडील दिनेश बिवाल यांनी पेपरच्या हार्ड कॉपीचे स्कॅनिंग करून त्याची पीडीएफ फाईल तयार केली. ही फाईल नंतर सीकर, राजस्थानमधील विविध कोचिंग संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. विशेष म्हणजे, यश स्वतः ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नव्हता आणि तो सध्या बीएएमएसचा विद्यार्थी आहे.
नाशिकमध्ये 'कन्सल्टन्सी'च्या नावाखाली काळा धंदा?
या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंतही पोहोचले आहेत. मुख्य आरोपी शुभम खैरनार याची नाशिकच्या पॉश कॅनडा कॉर्नर भागात ‘SR Education Consultancy’ नावाची संस्था आहे. गेल्या २-३ वर्षांपासून शुभम या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एमबीबीएस, बीएएमएस, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मार्गदर्शन करत होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर जाहिराती देऊन तो हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढत असे. राजस्थान पोलिसांच्या तपासात त्याचे नाव आल्यानंतर आता नाशिक पोलीसही या प्रकरणाचा तपास वाढवण्याची शक्यता आहे.
एका पेपरसाठी मोजले ५ लाख!
चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांनी कबुली दिली आहे की, हा पेपर मिळवण्यासाठी त्यांच्याकडून २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करण्यात आली होती. आता सीबीआयचा संपूर्ण तपास मनी ट्रेलवर केंद्रित आहे. हे पैसे कोणाच्या माध्यमातून कोणत्या बँक खात्यात गेले, याचा शोध घेतला जात आहे.
सीबीआयचा ससेमिरा आणि चौकशीचा फेरा
सीबीआयने या प्रकरणात अनेक कोचिंग संस्थांचे मालक, कर्मचारी आणि अटक केलेल्या आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी शुभम खैरनारने स्वतःला मास्टरमाइंड मानण्यास नकार दिला आहे, त्यामुळे या नेटवर्कचा मूळ स्रोत कोण आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे.