पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:46 IST2026-05-14T12:43:31+5:302026-05-14T12:46:01+5:30

कुटुंबाने रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. काही वेळातच चौघांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला होता.

Four members of Dokadia family in Paydhuni died due to rat poison; Sources say 'JJ' reported to police | पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती

पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती

मुंबई : पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा उलगडा करण्यासाठी गेल्या आठवड्यात जेजे रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातील तज्ज्ञांसोबत अन्य विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम सक्रिय झाली होती. अखेर पाच दिवसांनी यांनी अहवाल तयार केला असून त्यामध्ये मृत्यूचे कारण झिंक फॉस्फाईड उंदीर मारण्याचे औषधच असल्याचे सांगण्यात आले असून, हा अहवाल जेजे रुग्णालयाने बुधवारी पोलिसांना सादर केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.  

अब्दुल्ला डोकाडिया (४४), त्यांची पत्नी नसरीन (३५), मुलगी आयेशा (१६) आणि मुलगा औनब (१३) यांचा २६ मे रोजी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. कुटुंबाने रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. काही वेळातच चौघांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने डोकाडिया कुटुंबीयाच्या शरीरात झिंक फॉस्फाईड औषध सापडल्याचे सांगितले होते. 

त्यानंतर या प्रकरणात विविध वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा एकत्रित अभ्यास करून मृत्यूचे कारण निश्चित करण्याचे काम जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांना सांगण्यात आले होते. त्यानुसार मृत्यूस कारणीभूत ठरलेली विषबाधेची प्रक्रिया, मृत्यूचे स्वरूप, मृत्यूचा प्रकार, मृत्यू होण्याची वैद्यकीय प्रक्रिया, संबंधित व्यक्तींना पूर्वी काही गंभीर आजार होते का, अन्न विषबाधेस कारणीभूत रोगजंतूंची शक्यता आदी प्रश्नांची उत्तरे शोधून अखेर पोलिसांना अहवाल दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

झिंक फॉस्फाइड शरीरात गेले कसे? 

डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी जेजे रुग्णालय विविध विभागांतील तज्ज्ञांची संयुक्त बैठक घेणार आहे. चार ते पाच दिवसांत सर्व वैद्यकीय आणि तपास यंत्रणांचे अहवाल एकत्रितपणे तपासले जाणार आहेत. त्यानंतरच मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे. 

संबंधित डॉक्टरांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, हिस्टोपॅथॉलॉजी, शवविच्छेदन, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांचा पंचनामा यांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे झिंक फॉस्फाईड हे मृत्यूचे कारण असले तरी ते  त्यांच्या शरीरात गेले कसे, याचा मात्र उलगडा झालेला नाही. त्याचा पोलीस अधिकारी शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Four members of Dokadia family in Paydhuni died due to rat poison; Sources say 'JJ' reported to police