कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:59 IST2026-05-14T12:55:30+5:302026-05-14T12:59:51+5:30
दिवा-सावंतवाडी गाडीतील प्रवाशांना मनस्ताप; स्थानकावर कुचंबणा... जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना आदल्या रात्री १० वाजेपासून दिवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मुक्काम करावा लागत आहे.

कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
-अनिकेत घमंडी, डोंबिवली
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘परवडणारी’ म्हणून ओळखली जाणारी दिवा-सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस सध्या प्रवाशांसाठी नरकयातना ठरत आहे. या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना १२ तास केवळ शारीरिक कष्टच नाही, तर मानसिक छळही सहन करावा लागत आहे. जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना आदल्या रात्री १० वाजेपासून दिवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मुक्काम करावा लागत आहे. ही गाडी सकाळी ६ वाजता सुटते.
शुक्रवारी (८ मे) रात्री दिवा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ७, ८ वर रात्री ८:१५ वाजता गाडी आली. रात्री १०:४५ वाजता तिचे दरवाजे उघडण्यात आले. प्रवाशांनी धक्काबुक्की करत प्रवेश करून जागा अडविली. ते तसेच बसून होते. मात्र पुढे १२ तास त्यांना अनेक यातना सहन करत प्रवास करावा लागला.
अंधार आणि उकाड्यात प्रवास
स्टेशनवरील पाणपोई बंद होती. नवीन शौचालय प्रवाशांसाठी खुले केलेले नाही. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्रभर अंधारात प्रवासी गाडीत बसून होते. डब्यात ना पंखे सुरू होते, ना कुठून हवा येत होती. वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे.
आता प्लॅटफॉर्मवर लाईट तरी असतात, असे प्रवाशांनी सांगितले. पावसात प्रवासी आडोसा शोधून थांबायचे. सावंतवाडीपर्यंत जाताना सर्व स्टेशनवर थांबणारी ही एकमेव गाडी असल्याने ठाणे जिल्ह्यातील सामान्य प्रवाशांच्या सोयीची आणि परवडणारी आहे.
संपूर्ण दिवस गाडीत गर्दी
सावंतवाडी एक्स्प्रेसने जाताना आणि परतीसाठी तेथून दिव्याला येताना संपूर्ण दिवस गाडीतच जातो, तरीही तिला हजारो प्रवाशांची पसंतीची आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून येणाऱ्या प्रवाशांची गाडीत गर्दी होते. ती निघेपर्यंत डब्यांत पाय ठेवायलाही जागा राहत नाही.
अनेक वर्षांपासून असाच खडतर प्रवास करत आहोत. कोकणात जाणारे बहुतांश प्रवासी ठाणे जिल्ह्यात राहतात. त्यासाठी दिव्यातून जास्तीत जास्त रेल्वे सोडायला हव्यात, पण कोणी ऐकत नाही.
-रोहन शिर्के, प्रवासी
दरड कोसळणे, अपघात अशा तांत्रिक कारणाने वेळापत्रक कोलमडते. गाडीत जागा मिळवायला १० तास आधी येऊन रात्रभर दिवा स्थानकात थांबायचे. असे कुठे असते का.
-राजन नाईक, प्रवासी
सावंतवाडी एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल भीषण असतात. वर्षानुवर्षे प्रवासी असेच तिष्ठत प्रवास करतात. पाठपुरावा तरी किती करायचा, असा प्रश्न आहे. पाणपोई बंद होती, नवे स्वच्छतागृह अद्याप खुले केलेले नाही.
-ॲड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संस्था