ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:49 IST2026-05-14T13:48:19+5:302026-05-14T13:49:44+5:30

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हळद लावणं नवरा-नवरीला चांगलंच महागात पडलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, नवरीला थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं.

indore adulterated turmeric was applied to bride and groom both hospitalized one on ventilator | ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर

ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हळद लावणं नवरा-नवरीला चांगलंच महागात पडलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, नवरीला थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे दोघांचाही जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भेसळयुक्त हळदीमुळे नवरा-नवरीच्या त्वचेवर गंभीर ॲलर्जी झाली.

नवरीच्या चेहऱ्याला आणि ओठांना खूप सूज आली, प्रचंड त्रास झाला. इंदूरच्या एम.वाय. (MY) रुग्णालयात अलीकडेच अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जिथे हळदीच्या विधीदरम्यान नवरा आणि नवरी आजारी पडले. यापैकी काहींना व्हेंटिलेटरवर, तर इतरांना आयसीयू (ICU) मध्ये दाखल करावं लागलं होतं.

चेहरा व ओठांना सूज

खरगोन जिल्ह्यातील कसरावद येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय राखीच्या लग्नाचा आनंद चिंतेत बदलला. हळद लावल्यानंतर काही वेळातच तिच्या अंगावर लाल चट्टे उमटले आणि चेहरा व ओठांना सूज आली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. नातेवाईकांनी सांगितलं की, त्यांनी हळदीच्या विधीसाठी बाजारातून स्वस्त हळद विकत घेतली होती.

हळदीच्या ॲलर्जीची ४ ते ५ प्रकरणं  

राखीनंतर दूधिया येथील ३५ वर्षीय गोलू नावाच्या नवरदेवालाही अशाच प्रकारे रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याला इतकी गंभीर ॲलर्जी झाली होती की, त्याच्या फुफ्फुसांवर दाब वाढून जीव धोक्यात आला होता. गेल्या एका आठवड्यात एम.वाय. रुग्णालयात हळदीच्या ॲलर्जीची ४ ते ५ प्रकरणं समोर आली आहेत. सध्या सर्व रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. 

केमिकलयुक्त हळद

लग्नसराईत हळदीची मागणी वाढल्याने छोटे दुकानदार केमिकलयुक्त हळद विकत आहेत. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबं विधीसाठी मोठ्या प्रमाणात स्वस्त हळद खरेदी करतात, ज्याचा फटका नवरा-नवरीला बसत आहे. प्रशासनाने अन्न सुरक्षा मानकांनुसार अशा भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

हळद चमकदार दिसण्यासाठी त्यात 'मेटॅनिल येलो'

आयुर्वेदात हळदीला 'वरदान' मानलं जातं, मात्र केमिकलच्या भेसळीमुळे ती 'शाप' ठरत आहे. लग्नासारख्या कार्यात अख्खी हळद विकत घेऊन ती घरी दळून घ्यावी किंवा विश्वासार्ह ब्रँडचीच हळद वापरावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हळद अधिक चमकदार दिसण्यासाठी त्यात 'मेटॅनिल येलो' नावाचा सिंथेटिक रंग वापरतात. यामुळे शरीरातील 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

Web Title: indore adulterated turmeric was applied to bride and groom both hospitalized one on ventilator